Pune Crime News | मुंढव्यात गेल्या 15 दिवसांमध्ये तिघांचा खून; केशवनगरमध्ये तरुणाच्या डोक्यात वार करुन निर्घुण खुन
पुणे : Pune Crime News | मुंढव्यात गेल्या १५ दिवसांमध्ये तिघांचा खून झाला आहे. मुंढवा येथील केशवनगरमध्ये एका तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याचा निर्घुण खुन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
खुन झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस अंमलदार अमन किरण झेंडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केशवनगर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागे एक तरुण पडला असल्याचे १६ मे रोजी सकाळी पावणे आठ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला लोकांनी कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथे एक तरुण पडलेला दिसून आला. हा तरुण अंदाजे ४१ वर्षाचा असून तो गव्हाळ रंगाचा असून त्याने पांढर्या रंगाचा लाईनींगचा फुल शर्ट, निळ्या रंगाची फुल पँट घातली होती. कोणीतरी त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला होता. खुनाची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अन्य पोलीस अधिकार्यांनी भेट दिली.
खुन झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. परिसरातील कोणी बेपत्ता आहे का याचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी तपास करीत आहेत.
