Pune Crime News | पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्या रोहन साळवेवर हॉटेलचालकाला खंडणी मागितल्याचा आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | दारुच्या नशेत टिळक रोडवरील जयश्रीज गार्डन हॉटेलमध्ये गोंधळ घालणार्या तरुणाला ताब्यात घेऊन खडक पोलीस ठाण्यात नेले असता तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्यावर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन गौतम साळवे Rohan Gautam Salve (वय २६, रा. मिनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याबरोबरच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनंदा दीपक भोसले (वय ६२, रा. त्रिवेणी अपार्टमेंट, मित्र मंडळ कॉलनी, पर्वती) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार टिळक रोडवरील जयश्री गार्डन हॉटेलमध्ये ४ जून रोजी रात्री साडेअकरा ते ५ जून रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन साळवे याने आपण आर टी आय कार्यकर्ता व वकिल असल्याचे सांगून हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवता, त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करुन तुमची बदनामी करेऩ पोलिसांना फोन करुन हॉटेल बंद करेन. उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर २० हजार रुपये दर महिन्याला देण्याची मागणी केली. तसेच फिर्यादी यांचा व्हिडिओ काढून कुणाला तरी पाठवून ते इन्स्टाग्राम आय डी चालकाने तो इन्स्टाग्रामवर टाकला. त्याखाली फिर्यादी व पोलिसांबाबत बदनामीकारक मजकूर टाकून खोटी माहिती प्रसिद्ध केली़, अशा फिर्यादीवरुन रोहन साळवे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.
या वेळी रोहन साळवे हा गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पहाटे २ वाजता जयश्री हॉटेलवर गेले होते. त्यावेळी त्याने दारुच्या नशेत टपर्या, स्टॉल रात्री १० वाजता बंद करता, मग हॉटेल का बंद करत नाही, असे म्हणून गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला खडक पोलीस ठाण्यात नेल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शिवीगाळ केली़ पोलिसांना धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा आणला होता. पोलिसांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल करण्यात आला होता.
