Pune Crime News | पंचशील टॉवरमधील फ्लॅटला बायोमॅट्रीक लॉक असताना दरवाजाला नवीन कडी; कुलूप लावून फ्लॅटमध्ये येण्यास मुलाला केला मज्जाव, आई आणि पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | नोकरी गेल्याने हफ्ता भरता येत नसल्याने फ्लॅट भाड्याने देऊन त्यातून हफ्ता भरु हा मुलाचा प्रस्ताव आई आणि पत्नीने फेटाळून लावला. पंचशील टॉवरमधील फ्लॅटला बायोमॅट्रीक लॉक असताना दरवाजाला नवीन कडी, कुलूप लावून मुलाला घरात येण्यास मज्जाव केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अमरजितसिंग भूपेनदर कपूर (वय ४२, रा. पंचशील टॉवर, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीची आई भगवंत कौर (वय ६१) आणि पत्नी सरबजित कौर (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पंचशील टॉवरमधील एफ बिल्डिंगमधील २२ व्या मजल्यावरील फ्लॅटबाबत ६ जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची आई, पत्नी व मुलगी यांच्यासह पंचशील टॉवरमध्ये राहतात. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्यांनी ३ कोटींचे कर्ज घेतले होते. पत्नीबरोबर त्यांचे घरगुती कारणावरुन वाद होत असल्याने फिर्यादी यांनी पत्नीविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात एप्रिल २०२५ मध्ये घटस्फोटाची केस दाखल केली आहे. त्यानंतर जून २०२५ मध्ये त्यांची नोकरी गेली. त्यामुळे त्यांना बँकेचा २ लाख ७५ हजार रुपयांचा हप्ता भरणे कठीण झाले. तेव्हा त्यांनी पंचशील टॉवरमधील हा फ्लॅट भाड्याने देऊन त्या भाड्यातून बँकेचा हप्ता भरु. केसनंद येथील सोसायटीमध्ये जो फ्लॅट आहे. त्याचे फर्निचरचे काम पूर्ण करुन तेथे रहायला जाऊ असा प्रस्ताव मांडला. त्याला फिर्यादी यांची आई भगवंत कौर आणि पत्नी सरबजित कौर यांनी नकार दिला. त्या दोघींनी हा फ्लॅट सोडावा, यासाठी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात त्यांच्याविरुद्ध अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने १५ मे रोजी पत्नी व आईला हा फ्लॅट खाली करण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली होत. त्यांनी आतापर्यंत फ्लॅट सोडला नाही.
फिर्यादी हे ६ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता पंचशील टॉवरमधील फ्लॅटवर गेले. त्यांच्या फ्लॅटमध्ये बायोमॅट्रीक लॉक आहे. त्यामुळे पासवर्ड टाकला की फ्लॅट उघडता येतो. त्यांना फ्लॅट उघडता येऊ नये, म्हणून त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला नवीन कडी व कुलूप लावून त्या दुसरीकडे रहायला गेल्या. त्यांना घरात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला. पोलीस हवालदार सविता साबळे तपास करीत आहेत.
