Pune Crime News | BMW मधून फिरणार्या तिघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने पकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतुससह बीएमडब्ल्यु केली जप्त
पुणे : Pune Crime News | खंडणी विरोधी पथक नाकाबंदी करुन तपासणी करीत असताना BMW या आलीशान गाडीतून आलेल्या तिघांना संशयावरुन चौकशी केली. त्यात तिघेही सराईत गुन्हेगार निघाले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी या शस्त्रासह BMW जप्त केली आहे.
ओमकार बाळासाहेब घुले Omkar Balasaheb Ghule (वय २७, रा. दुर्वांकर बिल्डिंग, उंड्री), नारायण विश्वनाथ पुरी Narayan Vishwanath Puri (वय २७, रा. हंडेवाडी), स्वप्निल नंदकुमार हिरेमठ (वय २५, रा. बालाजी पदमावतीनगर, पिंसोळी) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
ओमकार घुले याच्यावर २०२० मध्ये वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच कोंढव्यामध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे. नारायण पुरी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २०२० मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हडपसर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये राईट तसेच २०२० मध्ये आर्म अॅक्ट आणि कोंढवा पोलीस ठाण्यात २०२० मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे. स्वप्निल हिरेमठ याच्यावर खडक पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये आर्म अॅक्ट आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे. ही BMW दुसर्याच्या नावावर असून ओमकार घुले हा ही गाडी आपण खरेदी केल्याचे सांगत आहे.
खंडणी विरोधी पथक २३ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पवन भोसले, आझाद पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी पांढर्या रंगाच्या BMW मधून उंड्री भागात फिरत असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी उंड्री चौक ते महमंदवाडी रोड येथे जयराज वॉशिंग सेंटरसमोर नाकाबंदी केली. येणार्या जाणार्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी सुरु केली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एक पांढर्या रंगाची BMW कार आली. पोलिसांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यातील तिघे जण रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे दिसून आले. त्यांनी ओमकार घुले याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टल आणि नारायण पुरी याच्याकडे एक जिवंत काडतुस मिळून आले. पोलिसांनी या शस्त्रासह BMW कारही जप्त केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना काळेपडळ पोलिसांकडे हवाली केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे व पोलीस अंमलदार पवन भोसले, आझाद पाटील यांनी केली आहे.
