Pune Crime News | अफूच्या चुर्याची विक्री करणार्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून पावणे तीन लाखांचा माल केला जप्त; खराडीमध्ये केली कारवाई
पुणे : Pune Crime News | अफुच्या बोंडाच्या चुर्याची (पॉपी स्ट्रॉ) विक्री करण्यासाठी राजस्थानमधून आलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने खराडीमध्ये पकडून त्यांच्याकडून २ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा १३ किलो ८० ग्रॅम माल जप्त केला आहे.
मुकेश बिष्णोई Mukesh Bishnoi (वय ३०, सध्या रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व पोलीस अंमलदार हे ६ जून रोजी खराडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार जान्हवी सूर्यवंशी यांना थिटे वस्तीतील खराडकर पार्क येथे रस्त्याच्या कडेला एक जण दोन गोण्यासह उभा असल्याचे दिसला. संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्याची झडती घेतली असता मुकेश बिश्णोई याच्याकडेील गोण्यांमध्ये १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफू) हा अंमली पदार्थ सापडला. खराडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, विशाल भिलारे, निशिकांत सावंत, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड यांनी केली आहे.
