Pune Crime News | खाकी गणवेशावर चुकीच्या जागेवर लावलेली नेम प्लेट, लायनर आणि हातातील स्टिक घेऊन दिखावा करणार्‍या तोतया पीएसआयचा झाला भंडाफोड

Pune Crime News | Impersonator PSI busted for showing off with wrong name plate, liner and stick in hand on khaki uniform

पुणे : Pune Crime News |  स्किन क्लिनिकमध्ये खाकी गणवेशात येऊन पीएसआय असल्याचे सांगून लवकर नंबर लावण्याचा प्रयत्न एक महिला करत होती. गणवेशावर चुकीच्या जागी लावलेली नेम प्लेट आणि लायनर तसेच एसीपी दर्जावरील पोलीस अधिकार्‍यांची स्टिक घेऊन दिखावा करणार्‍या या महिलेला चाणाक्ष सहायक पोलीस फौजदारांनी अचूक हेरले. चौकशी केल्यावर तिचा भंडाफोड झाला. या तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समिना आसिफ इनामदार ऊर्फ समिना आयुब पठाण Samina Asif Inamdar alias Samina Ayub Pathan (वय २५, रा. म्हाळुंगे) असे या तोतया महिलेचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार महेश भगवान शिंदे (वय ५०) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कॅम्पमधील व्हिक्टरी चित्रपटगृहासमोरील संजीवन स्किन क्लिनिक येथे ६ जून रोजी सकाळी १० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार शिंदे हे उपचारासाठी या क्लिनिकमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे खाकी गणवेशात एक महिला आली होती. येथे अगोदर अपॉईमेंट घ्यावी लागते. १५ दिवसांचे वेटिंग असते. रिसेप्शनला ही महिला मी पोलीस उपनिरीक्षक आहे. ड्युटीवरुन आले आहे, मला लवकर अपॉईमेंट हवी, असे सांगत होती. शिंदे हे तेथे गेले. तेव्हा तिने शिंदे यांना सांगितले की माझा नंबर लवकर लावायला सांगा. शिंदे यांनी त्यांचा खाकी गणवेश पाहिल्यावर त्यांना काहीतरी चुकल्या सारखे वाटत होते. तिने उजव्या बाजुला नेमप्लेट (संपूर्ण नाव) न लावता डाव्या बाजूस लावली होती. डाव्या बाजूला असलेली लायनर उजव्या बाजूला लावली होती. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी तुमचा नंबर लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडे विचारपूस सुरु केली. तिने सांगितले की, मी बाणेर पोलीस ठाण्याला असून आताच नाईट ड्युटी करुन आले आहे.

रात्रभर ड्युटी केल्यानंतरही तिचा गणवेश एकदम चकाचक दिसत होता. तसेच ती सतत गोल कॅप काढून व्ही कॅप घालत होती. तसेच तिच्या हातातील स्टिक  सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील अधिकार्‍यांना वापरण्याची परवानगी आहे, अशी लाकडी स्टिक तिच्या हातात होती. गणवेशामध्ये गडबडीत चुकीचे लावले जाऊ शकते, पण स्टिक कशी हिच्याकडे याविषयी शिंदे यांना शंका आली. त्यावर त्यांनी आणखी विचारपूस करता बाणेरमध्ये सिनियर साहेब कोण आहेत, याची चौकशी केल. तेव्हा तिने अगोदरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव सांगितले. रात्री ड्युटी करुन आलेल्या पीएसआयला झालेल्या बदलीची माहिती नसावी, हे चुकीचे वाटल्याने शिंदे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात कळवून दोन महिला पोलीस अंमलदारांना बोलावून या महिलेला ताब्यात घेतले. तिची रितसर चौकशी केल्यावर तिने आपण खोटे सांगितल्याचे कबुल केले. आपल्याला पीएसआय व्हायची इच्छा होती, असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक यादव तपास करीत आहेत.

You may have missed