Pune Water Supply | पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पुढील सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता, महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती
पुणे : Pune Water Supply | खडकवासला धरण समूहातील झपाट्याने घटणारा पाणीसाठा लक्षात घेता पुणेकरांना लवकरच पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील सोमवारपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, अशी माहिती पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.
पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण समूहाची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी असून, सध्या केवळ ५.८७५ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या सुमारे २० टक्के असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत प्रशासनाकडून याबाबत नियोजन करण्यात येणार असून, त्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल, उद्याने तसेच बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणण्याची शक्यता असून, पिण्याव्यतिरिक्त होणारा पाण्याचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत, उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ पुरेल यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.
दरम्यान, शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून दररोज सुमारे १६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हवामानातील बदल आणि अपेक्षेपेक्षा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय गंभीरपणे विचाराधीन असल्याचे संकेत मिळत आहेत.
