Pune Crime News | पुणे स्टेशन येथून एक वर्षाच्या बालिकेला पळवून नेणार्‍या तिघा जणांना 16 तासात केले जेरबंद, बालिकेची सुखरुप सुटका

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे स्टेशन परिसरात झोपलेल्या भोसले कुटुंबीयांच्या एक वर्षाच्या मुलीला पळवुन नेणार्‍या तिघा जणांना दौंड येथून १६ तासात जेरबंद करण्यात आले. बालिकेची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

पुणे स्टेशन परिसरातील दत्त मंदिरासमोर मोकळ्या जागेत भोसले कुटुंबीय ३० मे रोजी रात्री सव्वा नऊ वाजता झोपले होते. आई गाढ झोपेत असताना तिच्या एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलीचा शोध सुरु केला. गुन्हे शाखा व बंडगार्डन पोलीस यांनी स्टेशन परिसरातील तसेच आजु बाजुचे जवळपास ६५ हून अधिक कॅमेरे तपासले. त्यातील एका कॅमेर्‍यामध्ये महिला व पुरुष मुलीला घेऊन जाताना दिसले. पुणे रेल्वे स्टेशनवरील कॅमेरे तपासले असता संशयित महिला व पुरुष हे मुलीला प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरुन निघणार्‍या पनवेल -नांदेड -पनवेल या रेल्वेमधून घेऊन जाताना दिसले. पुणे स्टेशनपासून नांदेडकडे जाणार्‍या प्रत्येक स्टेशनवर आर पीएफ तसेच जीआरपी व स्थानिक पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकांना शोध घेण्याबाबत सुचना देण्यात  आली. तसेच स्थानिक पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची पथके संबंधित स्थानकांवर रवाना करण्यात आली. काही पथके कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, लातूर, दौंड या भागात रवाना केली. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर मुलीचा शोध घेत असताना दौंड रेल्वे स्थानक परिसरात तिघे मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेस सुखरुप पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांनी सांगितले की, लकी जाधव (वय २५, रा. जालना), त्याची पत्नी व सासु यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. लकी जाधव याच्या पत्नीची उजवी बाजू भाजल्याने जळाली आहे. तिला मुल होणार नव्हते. म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे ते सांगतात. हे तिघे फिरस्ते आहेत. ते कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन पुणे स्टेशनला आले होते. त्यांनी आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षाच्या मुलीला उचलले व ते पनवेल -नांदेड या गाडीत जाऊन बसले. गाडीत बसल्यानंतर मुलीला पळवुन नेल्याचे समजले. पोलिसांनी सर्वत्र कळविले होते. आरपीएलचे पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी गाडीत शोध घेतल्यावर त्यांना हे तिघे आढळून आले. तोपर्यंत दौंड पोलिसांना याची माहिती मिळाली होती. पोलीस रेल्वे स्थानकावर पोहचले होते. गाडीतून हे तिघे उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्ष संदिपान पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप, आरपीएफ भगवान इप्पर, एलसीबी पोलीस निरीक्षक उस्मानाबाद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौघुले, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, तसेच आर पीएफ प्रविण गाढवे, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अंमलदार, खंडणी विरोधी पथक, युनिट ५ व ६ ची पथके यांनी केली आहे.

You may have missed