Pune Crime News | प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याने दाजीवर केला हल्ला; मेव्हण्याच्या मित्राने वार करुन केले जखमी, कोरेगाव पार्कमधील ढोले पाटील रोडवरील घटना
पुणे : Pune Crime News | मुलीच्या घराच्या विरोधात जाऊन त्यांनी प्रेमविवाह केला. विवाहानंतर त्यांना नुकताच मुलगा झाला. तरीही त्यांचा राग काही शांत झाला नाही. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन मेव्हण्याने आपल्या दाजीवर मित्राच्या मदतीने हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला जखमी केले.
किरण धनराज खरात (वय ३१, रा. ताडीवाला रोड, प्रायव्हेट रोड, सिद्धार्थनगर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल गौतम जगताप Sahil Gautam Jagtap (वय ३०, रा. ताडीवाला रोड) आणि रोहन निगडे (वय ३१, रा. मारुती मंदिराजवळ, ताडीवाला रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोरेगाव पार्कमधील ढोले पाटील रोडवरील निलम वाईन्स येथे ९ मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण खरात हे स्विगीचे डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्यांनी दोन वर्षापूर्वी स्नेहा गौतम जगताप हिच्याबरोबर प्रेमविवाह केला. लग्नाला स्नेहा हिच्या घरच्यांचा विरोध होता. विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले. त्यामुळे पत्नीच्या घरचे लोक व त्यांच्यात वाद आहेत. त्यांना १२ दिवसापूर्वी मुलगा झाला आहे. ९ मे रोजी रात्री साडेदहा वाजता किरण खरात हे ढोले पाटील रोडवरील निलम वाईन्स येथे गेले होते. तेथे त्यांच्या पत्नीचा भाऊ साहिल जगताप, रोहन निगडे हे उभे होते. ते किरणजवळ येऊन म्हणाले की, आम्ही तुला २ -३ दिवसांपासून शोधत आहेत. तुला बघुन घेतो, असे म्हणून शिवीगाळ करुन दोघांनी किरणला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रोहन निगडे याने तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केला. तो त्यांच्या डोळ्याच्या वर डोक्यावर लागला. त्याचवेळी बीट मार्शल तेथे आले. पोलिसांना पाहून दोघे पळून गेले. ससुन रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भागवत तपास करीत आहेत.
