Pune Crime News | कोंढव्यात लहान मुलांच्या भांडणातून मोठा तणाव; पोलीस ठाण्यावर दगडफेक, दोन्ही गटावर दंगलीचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सोसायटीमध्ये कार्यक्रमाला आलेल्या लहान मुलांमध्ये झालेल्या मारामारीमध्ये मोठ्यांनी हस्तक्षेप केल्याने कोंढव्यात दोन समाजात मोठा तणाव निर्माण झाला. त्यातून कोंढवा पोलीस ठाण्याला मोठ्या जमावाने घेराव घालून दगडफेक केल्याचा प्रकार मध्यरात्री घडला. कोंढवा पोलिसांनी दोन्ही गटांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये कार्यक्रमामध्ये लहान मुले आली होती. त्यात या लहान मुलांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यात मोठ्यांनी अनावश्यक लक्ष घातल्याने वाद वाढत गेला. कोंढवा गावातील लोकांना याची माहिती मिळाल्यावर तेथील काही तरुण या सोसायटीत आले. त्यांना यातील मुलांना मारहाण केली. त्यातून या सोसायटी बाहेर मोठा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी मारहाण झालेल्या मुलांना पोलीस ठाण्यात नेले. त्यातून दोन्ही समाजातील जमाव पोलीस ठाण्यात गेला. त्यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गर्दीतील लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. काही लोकांनी पोलीस ठाण्याबाहेरील रस्त्यावर ठाण मांडून रस्ता आडवला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक नगरसेवक तेथे धावुन गेले. मध्यरात्रीपर्यंत तणाव निर्माण झाला होता. कोंढव्यातील मान्यवर लोकांनी दोन्ही समाजातील लोकांना समजावुन सांगितल्याने हा जमाव पांगला. पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढविला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
