Pune Crime News | वाड्यातील भाडेकरुला नवीन बांधकामात दुकान परत न देता फसवणूक करणार्या सुराणा बिल्डर्ससह चार जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | वाडा पाडून विकसित करताना जुन्या जागेत दुकान असलेल्या आजीला वाढीव क्षेत्रफळाचे दुकान देण्याचा करार करताना खाडाखोड करुन अस्तित्वात नसलेले १२ अ दुकान देण्याचा करार केला. त्यासाठी आणखी १ लाख ३० हजार रुपये घेऊन दुकान न देता फसवणूक केल्या प्रकरणी सुराणा बिल्डर्ससह चौघांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अविनाश विनायक सूर्यवंशी (वय३२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुराणा बिल्डर्सचे (Surana Builders) उदयकांत भानुदास सुराणा (Udaykant Bhanudas Surana), प्रित सुहास ठाकुर (Prit Suhas Thakur), तेजस सुहास ठाकुर (Tejas Suhas Thakur), सुहास मुरलीधर ठाकुर (Suhas Murlidhar Thakur) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवार पेठेत जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१३ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आजी प्रभावती जगन्नाथ सूर्यवंशी या गुरुवार पेठेतील वाड्यात भाडेकरु होत्या. त्यांचे एक दुकान होते. त्या ठिकाणी त्या शिलाई मशीनचे काम करत होत्या. सुराणा बिल्डर्स, प्रमोटर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे उदयकांत सुराणा यांनी २००८ -०९ मध्ये ती सर्व जागा डेव्हलप करण्यासाठी घेतली. त्यावेळी आजीचे दुकान ८० स्क्वेअर फुट होते. त्यांना ते १०० स्क्वेअर फुटाचे दुकान देणार होते. त्यासाठी १ लाख ९० हजार रुपये जास्तीचे सुराणा बिल्डर्स यांना द्यायचे होते. त्यापैकी १ लाख ३० हजार रुपये त्यांनी सुराणा यांना दिले. उरलेले ६० हजार रुपये प्रत्यक्ष दुकानाचा ताबा मिळाल्यावर द्यायचे असे ठरले होते.
सुराणा बिल्डर्स आजीला १२ अ हे दुकान देणार होते. तसा करार केला होता. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी दुकानाची मागणी केली. सुराणा याने टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी महापालिकेतील प्लॅन पाहिल्यावर त्यात १२ अ हे अस्तित्वात नव्हते. सुराणा याने अस्तित्वात नसलेले १२ अ दुकान देण्याचा वायदा करुन त्यांच्याबरोबर करार केला होता. आजीचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या तिच्या वारसांना देखील दिलेला नाही. सुराणा बिल्डर्स हे दुकान प्रभावती सूर्यवंशी यांना देणार असल्याचे माहिती असतानाही प्रिता सुहास ठाकूर, तेजस सुहास ठाकूर, सुहास ठाकूर यांनी ते दुकान १४ मार्च २०१३ रोजी ६ लाख रुपयांना विकत घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करीत आहे.
