Pune Cyber Crime | निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची 1.07 कोटी रुपयांची फसवणूक
पुणे : Pune Cyber Crime | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेला डीपफेक व्हिडिओ दाखवून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाने इन्स्टाग्रामवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुंतवणूक आणि ट्रेडिंगसंदर्भात मार्गदर्शन करत असल्याचा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ हुबेहूब खरा असल्यासारखा दिसत होता. ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठा परतावा मिळवता येईल, असा दावा त्यामध्ये करण्यात आला होता.
व्हिडिओवर विश्वास ठेवून व्यावसायिकाने दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्याच्याकडून आधारकार्डसह विविध कागदपत्रे घेतली. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने टेलिग्रामद्वारे संपर्क साधून स्वतःची ओळख ‘रिलेशनशिप मॅनेजर’ म्हणून करून दिली.
या व्यक्तीने व्यावसायिकासाठी बनावट ऑनलाइन ट्रेडिंग खाते उघडून सुरुवातीला २० हजार ३४१ रुपये गुंतवण्यास सांगितले. काही वेळाने सायबर चोरट्यांनी एक हजार रुपये पाठवून हा पहिल्या गुंतवणुकीवरील नफा असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यावसायिकाचा त्यांच्यावर विश्वास बसला.
यानंतर २ जून ते २३ जुलै या कालावधीत ३६ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे व्यावसायिकाकडून एकूण १ कोटी ७ लाख रुपये जमा करून घेण्यात आले. बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर त्याचा नफा सातत्याने वाढत असल्याचे दाखवण्यात येत होते.
मात्र, व्यावसायिकाने गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढण्याची मागणी करताच आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
सायबर गुन्हेगारांनी बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसह स्पेसएक्सच्या प्री-लिस्टिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित व्यावसायिकाने प्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर आणि त्यानंतर पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
