Pune Crime News | शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेसह तरुणांची 24 लाखांची फसवणूक करणार्या सूर्यकांत सपकाळ, योगेश पाटीलवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ससून रुग्णालयात त्यांची मेडिकल करुन बनावट नियुक्ती पत्रे देऊन एका महिलेसह ५ तरुणांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यकांत विठ्ठल सपकाळ Suryakant Vitthal Sapkal (वय ४६, रा. सेवाधाम हॉस्पिटलशेजारी, तळेगाव दाभाडे), योगेश अदिकराव पाटील Yogesh Adikrao Patil (वय ४२, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पर्वती भागात राहत असून सामाजिक कार्य करतात. त्यांच्या पतीचे २०१७ मध्ये निधन झाले. त्या घरकाम करतात. सामाजिक कार्य करीत असताना सूर्यकांत सपकाळ याची एप्रिल २०२० मध्ये ओळख झाली. त्याने तो महसूल खात्यामध्ये अधिकारी पदावर असून मंत्रालयामध्ये त्याची ओळख आहे. तो बिझनेस डेव्हलपमेंट संदर्भात मार्गदर्शन करतो. त्याचे रहाटणी येथे कार्यालय असल्याचे सांगितले. त्याने महसूल, रेल्वे खाते व इतर सरकारी खात्यामध्ये परमनंट नोकरी लावुन देऊ शकतो. कोणाला आवश्यकता असल्यास सांगा, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी मला नोकरी मिळेल का असे विचारले.
महसूल खात्यामध्ये शिपाई पदावर नोकरी लावुन देतो, असे सांगून त्याकरीता ५ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानंतर ऑक्टोंबर २०२२ मध्ये तो शिपाई पदासाठी २ लाख रुपये अगाऊ कॅश व कागदपत्रे घरी येऊन घेऊन गेला. त्यानंतर त्याने इतरांकडूनही प्रत्येकी २ लाख रुपये घेतले. त्यांना मेडिकलसाठी समाजकल्याण आयुक्तालय यांचे सही व शिक्का असलेले पत्र पोर्टरद्वारे घरी पाठविले. त्यांची ससून रुग्णालयात मेडिकल करुन घेण्यात आली. समाजकल्याण खात्याचे पत्र व ससूनमध्ये मेडिकल झाल्याने त्यांचा त्यावर विश्वास बसला. काही जणांना उत्पादन शुल्क विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीसाठी प्रत्येकी ७ लाख रुपये मागितले. त्याने तरुणांकडून त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे सही असलेले ज्युनिअर इंजिनिअर पदाचे नियुक्ती, तसेच एकाला राज्य उत्पादन शुल्क यांचे सही असलेले लिपिक पदाचे नियुक्तीचे पत्र पाठविले.
या तरुणांना हे नियुक्ती पत्र व मुळ कागदपत्रे घेऊन ८ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एका अधिकारी यांना देण्यास सांगितले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथे योगेश पाटील येऊन भेटला. त्याने नियुक्त पत्र व इतर कागदपत्रे त्यांच्याकडून घेऊन एका महिन्यांमध्ये नियुक्तीचे काम होईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी नियुक्तीबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्याने धनादेश दिला. तो बँकेत भरल्यावर खात्यात पैसे नसल्याने तो बाऊन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आता फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.
