Pune News | गणेश विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरवरील निर्बंध मागे घ्या; युवासेनेची पुणे पोलिसांकडे मागणी
पुणे : Pune News | सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत स्पीकर वापरण्यावर पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध मागे घेण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी विसर्जन मिरवणूक जवळपास २४ ते ३० तास सुरू असते. या काळात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने कायदा-सुव्यवस्था, वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करण्यामध्ये पुणे पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते.
गणेशोत्सव काळात हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र बंदोबस्तासाठी कार्यरत असतात. मानाच्या गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर विसर्जन मिरवणुकीत स्पीकर वापराबाबत पोलीस प्रशासनाने निर्बंध घातल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. असा निर्णय घेण्यापूर्वी शहरातील सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणे आवश्यक होते, असे बागुल यांनी म्हटले आहे.
गणेश मंडळांचे बहुतांश कार्यक्रम लोकवर्गणीतून आयोजित केले जातात. अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी स्पीकर आणि ध्वनीव्यवस्थेचे यापूर्वीच बुकिंग केले असल्याने अचानक निर्बंध लागू झाल्यास मंडळांना आर्थिक आणि नियोजनात्मक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे गणेश मंडळांना विश्वासात न घेता विसर्जन मिरवणुकीतील स्पीकरबाबत घेतलेले निर्बंध मागे घ्यावेत आणि संबंधित निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी युवासेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी केली आहे.
