Training aircraft crashes in Baramati | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला त्या गावात प्रशिक्षण विमानाला अपघात; शिकाऊ पायलट बचावला
पुणे : Training aircraft crashes in Baramati | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ ज्या गोजुबावी गावाजवळ अपघात झाला. त्याच गावाजवळ एका प्रशिक्षण विमानाला बुधवारी सकाळी अपघात झाला. त्या विमानात एकच शिकाऊ पायलट होता. सुदैवाने या वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी झाला. रेड बर्ड एव्हिएशन या प्रशिक्षण संस्थेचे हे विमान आहे. बारामती मध्ये रेड बर्ड एव्हिएशन हे तरुणांना वैमानिकाचे प्रशिक्षण देत असतात.
पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी या अपघाताबाबत माहिती दिली. रेड बर्ड एव्हिएशनचे विमान सकाळी साधारण ८ वाजून ५० मिनिटांनी बारामती विमानतळाला लागून असलेल्या गोजुबावी गावाजवळ कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमी उंचीवर हे विमान उड्डाण करत असताना विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा. त्यानंतर वैमानिकाने क्रॅश लँडिगचा प्रयत्न केला. त्या दरम्यान जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमानाचा एक भाग एका विजेच्या खांबाला धडकला. विमानात केवळ एकच प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. सुदैवाने वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक ती चौकशी करण्यात येत आहे.
