Pune Crime News | प्राथनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा करणार्या पास्टरसह 8 जणांवर जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल
पुणे : प्रार्थनेतून कर्करोग, ट्युमर असे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणार्या एका पास्टरसह ८ जणांवर जादुटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महिला कार्यकर्ता भाग्यश्री सूर्यकांत मोहिते (वय ३२, रा. येरवडा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पास्टर केनेथ पॉल सिल्वे Pastor Kenneth Paul Silve (रा. क्वीनस टाऊन, बिजलीनगर रोड, चिंचवड) व त्यांच्या सोबतच्या ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील जीजस इज लॉर्ड चर्च येथे रविवारी १४ जून रोजी दुपारी दीड वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अंधश्रद्धा मुक्ती मिशन या संस्थेच्या सदस्य आहेत. समाजातील अघोरी प्रथा/अंधश्रद्धा निर्मुलनाचे व जनजागृतीचे काम करतात. त्यांना युटयुब चॅनलवर केनिथ सिल्वे मिनीस्ट्रीज गॉस्पेन अॅन्ड वरशिप यावर एक संदेश प्रसारित केला होता. त्यात पास्टर केनिथ सिल्वे हे प्रार्थनेद्वारे नागरिकांचे असाध्य आजार बरे करतो, असे सांगून लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात, अशी त्यांना माहिती होती. त्यामुळे त्याची खातरजमा करण्यासाठी त्या व त्यांची मैत्रिण निशा विनु वाघिरे (वय २७, रा. शिवाजीनगर) या १४ जून रोजी दुपारी दीड वाजता कोंढव्यातील जीजस इज लॉर्ड चर्च येथे गेल्या. तेथे अंदाजे ३०० ते ४०० स्त्री पुरुष, लहान मुले मुली उपस्थित होती.
चर्चमध्ये प्रवेशावेळी तेथील वॉलिंटियर यांनी त्यांच्याकडून एक फॉर्म भरुन घेतला. तेथील महिला वॉलिंटियरने त्यांना एक छोटी प्लास्टिकची बाटली दाखवली व सांगितले की, ही बॉटल तुम्ही घ्या, याने तुमचे सर्व आजार बरे होतील, या बॉटलमधील औषध तुम्ही पाण्यात टाकून प्या. तुम्हाला गाठ असेल तर तुम्ही गाठीवर लावा. जिथे त्रास आहे, तिथे लावा म्हणजे तुमचा सर्व त्रास कमी होईल, तुम्ही हे घ्या. याची किंमत २० रुपये आहे. बाटली घेऊन त्यांनी चर्चमध्ये प्रवेश केला. स्टेजवर पास्टर केनेथ सिल्वे व ७ ते ८ स्त्रीपुरुष बसले होते. एका मुलाला ताप येत होता. ३ डॉक्टरांना दाखविले, पण फरक पडत नव्हता. पास्टर केनेथ सिल्वे यांनी येशुला प्रार्थना केली त्यामुळे या मुलाचा ताप कमी होऊ तो बरा झाला. केनेथ सिल्वे हे लोकांना मार्गदर्शन केले.
शरीराच्या ज्या भागात आजार आहे. त्या भागावर उजवा हात ठेवा. कर्करोग, ट्यूमर कोणताही विकार असू देत देव तुम्हाला बरे करणार आहे, असे पास्टर केनेथ सिल्वे यांनी उपस्थितांना सांगितले. ते अंधश्रद्धा पसरवित असल्याचे पाहून फिर्यादी यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण सुरु केले. तेव्हा तेथील ७ ते ८ महिलांनी त्यांचे चित्रीकरण थांबविले. त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या मोबाईलमधील चित्रीकरण केलेले व्हिडिओ डिलीट केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करीत आहे.
