Pune Crime News | पुणे : दारु पिऊन मारहाण करुन दहशत निर्माण करणार्या गुंडाची पोलिसांकडे तक्रार केल्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात घातला दगड
पुणे : Pune Crime News | दारु पिऊन मारहाण करुन दहशत निर्माण करणार्या गुंडाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेता कोणतीही कारवाई न केल्याने गुंडाने तक्रार करणार्या रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आहे. ही घटना कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदिराजवळील महाराष्ट्र बँक चौकात १५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
याबाबत कृष्णा रामचंद्र ढगे (वय ३१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम गोफणे (रा. खडकवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा ढगे हे रिक्षाचालक आहेत. शुभम गोफणे हा कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदिराजवळील रिक्षा स्टँडवर थांबलेल्या रिक्षाचालकांना नेहमीच दारु पिऊन येऊन दहशत निर्माण करत असतो. त्याने कृष्णा ढगे यांना मारहाण केली होती. त्याची तक्रार त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु, पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही, असे कृष्णा ढगे यांनी सांगितले.
ते व त्यांचे मित्र १५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घरी जात असताना शुभम गोफणे याने त्यांना अडवले. पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरुन त्यांना शिवीगाळ करुन रस्त्यावर पडलेला दगड उचलून डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. कृष्णा ढगे यांना मित्रांनी रुग्णालयात नेले. ढगे यांच्या डोक्यावर डॉक्टरांनी तीन टाके घालून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस हवालदार संतोष कदम तपास करीत आहेत.
