Pune Crime News | घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगाराला पकडून चंदननगर पोलिसांनी 3 गुन्हे आणले उघडकीस
पुणे : Pune Crime News | खराडी आणि वडगाव शेरी येथे एकाच दिवशी दिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच चोरटा असल्याचे दिसून आले. त्यावरुन चंदननगर पोलिसांनी चोरट्याला पकडून त्याच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
रफिक हुसेन शेख Rafiq Hussain Shaikh (वय ३२, रा. चिंतामणीनगर, सय्यदनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील खराडी येथील तुकाराम नगर येथील सिद्धार्थ शशिकांत भोसले यांच्या बंगल्याचा कडीकोयंडा ताडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील ३ लाख ६० हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. तसेच वडगाव शेरी येथील नामदेवनगरमध्ये राहणार्या अर्चना दत्तात्रय बोरडे यांचे घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने १ लाख ८७ हजार रुपयांचे दागिने, रोकड चोरुन नेले होते . २४ एप्रिल २०२६ मध्ये दोन्ही दिवसा घरफोड्या झाल्या होत्या.
चंदननगर पोलिसांनी या दोन्ही ठिकाणचे तसेच आजूबाजूचे, चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन्ही ठिकाणी एकच संशयित व्यक्ती आढळून आला. त्यावरुन या घरफोड्या रफिक शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शोध घेऊन त्याला हडपसर परिसरातून अटक केली. या दोन घरफोड्या तसेच गेल्या वर्षी झालेली एक घरफोडी अशा तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, विकास बाबर, महेश लामखेडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पोलीस अंमलदार पाटील, लहाने, बेंद्रे यांनी केली आहे.
