Shivraj Motegaonkar Arrested | मोबाईलमध्ये पेपरफुटीचे पुरावे आढळल्याचा दावा; आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या अटकेत
पुणे : Shivraj Motegaonkar Arrested | पेपरफुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Raghunath Motegaonkar) यांना सीबीआयने अटक केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांना ताब्यात घेऊन तब्बल ११ तास चौकशी केली होती. रात्रभर चाललेल्या चौकशीनंतर मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यभरात मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेसच्या अनेक शाखा असून, डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणारे क्लासमालक म्हणून त्यांची ओळख आहे. जेईई आणि नीट परीक्षेत त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत असल्याने आरसीसी क्लासेस पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला यांसह अनेक शहरांत या क्लासेसचा विस्तार आहे.
या प्रकरणात आता सीबीआयकडून क्लासमधील विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. काही पालक आपल्या पाल्यांसह सीबीआय कार्यालयात दाखल झाल्याने या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातच प्रसिद्ध क्लास संचालकांवर कारवाई झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर यांचे पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळवून ती उत्तरांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
सीबीआयकडून मोटेगावकर यांच्या मोबाईलमधील डेटा, चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू असून, मोबाईलमध्ये पेपरफुटीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे आढळल्याचा दावा केला जात आहे. पुढील तपासातून या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे शिक्षण क्षेत्रासह पालकांचे लक्ष लागले आहे.
