Pune Crime News | स्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांना कोणाचे ‘अभय’? एकाच दिवसात गुन्हे शाखेकडून बेकायदा धंद्यांवर दोन कारवाया
स्वारगेटच्या हद्दीत कोण ‘संधी’प ‘साधू’ पणा करीत आहे याची खमंग चर्चा रंगली आहे
पुणे : Pune Crime News | शहरात कोणतेही बेकायदा धंदे खपवून घेणार नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार इशारे दिले असताना अनेक पोलीस ठाण्यांच्या परिसरात बेकायदेशीर धंदे सुरु असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. स्वारगेट परिसरातील बेकायदा धंद्यांवर गुन्हे शाखेने मंगळवारी भर दिवसा एकाच दिवसात दोन कारवाया केल्या. त्यामुळे या बेकायदा धंद्यांना कोणाचे सरंक्षण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. स्वारगेटच्या हद्दीत कोण ‘संधी’प ‘साधू’ पणा करीत आहे याची खमंग चर्चा रंगली असतानाच पोलीस ठाण्यापासून ते झोनच्या वरिष्ठांचे कामकाज पाहणाऱ्याच्या या सर्व धंद्यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यातून बद्लीझाल्यानंतर फरासखाना बिल्डिंगमध्ये असणाऱ्या पोलीस ठाण्यात कर्तव्य बजाविणाऱ्या एक पोलीस कर्मचारी देखील यापाठीमागे असल्याचे बोलले जात आहे.
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने स्वारगेट समोरील नटराज हॉटेलच्या पाठीमागील मराठा चेंबरकडे जाणार्या रोडवरील पत्र्याच्या शेडवर मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजता रेड केली. या ठिकाणी काही जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. हा जुगार अड्डा तडीपार गुंड शाबीर ऊफ शाहू महंमद शेख (वय ३७, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) आणि बसवराज गुंडप्पा कन्ने (वय ४५, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांचा आहे. याबाबत पोलीस हवालदार सचिन रमेश माळवे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनोहर नारायण जंगम (वय ५५, रा. रायकर मळा, धायरी), संतोष ज्ञानोबा ढमाले (वय ४९, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ), गोरख विश्वनाथ भोसले (वय ६०, रा. खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ), समीर अहमद खान (वय २६, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), राजु उर्वीदास भारद्वाज (वय ४५, रा. स्वारगेट), सलीम मैनुद्दीन भालके (वय ४५, रा. कुमार पृथ्वी बिल्डिंगसमोर, कोंढवा), करवीर ज्योतीबा मांजरे (वय ३९, रा. घुले कॉलनी, मांजरी), नारायण मल्लाराव नाटेकर (वय ७५, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) तसेच मालक शाबीर शेख आणि बसवराज कन्ने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शाबीर शेख याच्या जुगार अड्डयावर हे कल्याण मटका जुगार खेळत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ११ हजार ८१० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा रोडवरील एस टी कॉलनी जवळील सार्वजनिक शौचालयाच्या खोलीतून विदेशी मदयविक्री उघडकीस आणून ४७ हजार रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केला आहे.
शाबीर महंमद शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जुगार कायद्यांतर्गत एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी तडीपार केले होते. तरीही तो शहरात बिनधास्त वावरत होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने काही दिवसांपूर्वी डायस प्लॉट येथे तडीपारीचा भंग करुन शहरात आल्याबद्दल पकडले होते. असे असताना त्याचे जुगार अड्डे सर्रास सुरु असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईत दिसून आले आहे. त्यामुळे या गुन्हेगाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते की काय अशी पोलीस दलात चर्चा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
