Chandrashekhar Bhange | लोकशाही न्यूजचे पुणे ब्युरो चंद्रशेखर भांगे ‘अक्कलकोट रत्न’ पुरस्काराने सन्मानित
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण; पुण्यात अक्कलकोटच्या कर्तृत्ववानांचा गौरव
पुणे : Chandrashekhar Bhange | अक्कलकोट तालुक्याशी नाळ जोडलेली असतानाच पुणे शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून अक्कलकोटचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव पुण्यात करण्यात आला. गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने आयोजित ‘अक्कलकोट भूषण व रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ शनिवारी नितू मांडके सभागृह, स्वारगेट येथे उत्साहात पार पडला. अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, उद्योग, प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्था आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १५ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
चार मान्यवरांना अक्कलकोट भूषण
अक्कलकोट भूषण पुरस्काराने जन्मेजयराजे भोसले महाराज, मल्लिनाथ कलशेट्टी, माधव राजगुरू आणि शरणकुमार लिंबाळे यांचा गौरव करण्यात आला.
तर अक्कलकोट रत्न चंद्रशेखर लोकशाही न्यूज बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा न्यायाधीश, पुणे), महेश बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), रविकांत पाटील (सहकार व साखर उद्योग), विरभद्र हारकूड (संस्थापक अध्यक्ष, अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघ), गणेश फुलारी (उद्योजक), संजीवकुमार हिळ्ळी (छायाचित्रणकार), सिद्धार्थ कापसे (युवा उद्योजक), डॉ. अमोगसिद्ध चेंडके (मराठी भाषा व संतसाहित्य अभ्यासक) आणि अॅड. सदाशिव माळगे (शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र) यांचा सन्मान करण्यात आला.
‘दरवर्षी पुरस्कार सोहळा घेणार’
गावगाथा मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे म्हणाले, “नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलो तरी आमची नाळ अक्कलकोटच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे. पुण्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अक्कलकोटच्या भूमिपुत्रांचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि मनोबल वाढावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल.”
‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’चे प्रकाशन
सोहळ्यात प्रा. सदाशिव माळगे लिखित ‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान लाभले.
उपक्रमाचे आमदारांकडून कौतुक
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी गावगाथा मीडिया नेटवर्कच्या उपक्रमाचे कौतुक केले. पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक झाल्यानंतरही अक्कलकोटच्या जनतेशी नाते कायम ठेवून तालुक्यातील कर्तृत्ववानांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. “धोंडप्पा नंदे यांच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे आणि उत्साही तालुकावासीयांना भेटता आले, हे माझे भाग्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या पुरस्कार सोहळ्यामुळे पुण्यात वास्तव्यास असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र येण्याची आणि एकमेकांच्या कार्याची ओळख होण्याची संधी मिळाली. अक्कलकोटपासून दूर राहूनही आपल्या कार्यातून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कल्याणराव मंठाळे, सोमेश्वर वाडी, डॉ. अमोगसिद्ध चेंडके, स्वामी चांगुले, संतोष राठोडे, प्रा. सदाशिव माळगे, अंबादास गवंडी आणि राहुल भंडारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामागील संकल्पना, पुढाकार आणि अक्कलकोटकरांना एका व्यासपीठावर आणण्याची भूमिका गावगाथा मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे यांची होती. यापुढेही अक्कलकोटच्या कर्तृत्ववान भूमिपुत्रांचा गौरव करण्याची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
