Pune Crime News | विकलेल्या जागेचे पैसे न मिळाल्याच्या कारणावरुन भिंत पाडून अतिक्रमण करुन हॉलमधील साहित्य चोरुन तेथे म्हशी बांधून केला गोठा, वाघोलीतील घटना

Crime

पुणे : Pune Crime News |  त्यांनी जागा विकली होती़ पण, पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. आपल्याला पैसे मिळाले नाही, असा त्यांचा दावा होता. त्यातून त्यांनी विकलेल्या जागेत अतिक्रमण केले. हॉलचे बांधकाम केलेली भिंत पाडली. तेथे आपल्या म्हशी नेऊन बांधून त्याचा गोठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉलमधील एप्लिफायर,  मिक्सर व इतर साहित्य असा ४ लाख ४५ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अविनाश प्रभाकर भिंगारदिवे (वय४१, रा. काळुबाईनगर, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेश एकनाथ आव्हाळे Mahesh Eknath Awhale (रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, आव्हाळवाडी) व त्यांच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केसनंद येथील तळेरानवाडी येथील गट नंबर ४५१ येथे २२ म रोजी सकाळी १० वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आव्हाळे यांनी त्यांची जागा अविनाश भिंगारदिवे यांना विकली होती. भिंगारदिवे यांनी त्याच्या जागेत बांधकाम केले होते. हॉल तयार करुन त्यात एप्लिफायर, मिक्सर व इतर साहित्य ठेवले होते. भिंगारदिवे हे गावी गेले असताना महेश आव्हाळे व इतरांनी हॉलच्या उत्तरेकडील भिंत पाडून अनधिकृतपणे भिंगारदिवे यांच्या हॉलमध्ये प्रवेश केला. हॉलमधील ४ लाख ४५ हजार रुपयांच्या साहित्य चोरुन नेले. हॉलचा बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथे म्हशींचा गोठा केला आहे.

याबाबत वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांचा जमिनीच्या पैशांवरुन वाद आहे. महेश आव्हाळे यांनी भिंगारदिवे यांना जमीन विकली आहे. आव्हाळे यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जागा विकली असली तरी त्याचे पैसे मला मिळाले नाहीत. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.