Pune Crime News | धोंड्याचा महिना ठरतोय विवाहितांचा काळ; जावयाच्या मानपानावरुन छळ झाल्याने महिन्याच्या आत तीन विवाहितांनी संपविले आपले जीवन

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | अधिक मासात (धोंड्याचा मास) जावयाला घरी बोलावून त्याला सुग्रास भोजन घालून त्याला भेट वस्तूची प्रथा आहे. पण, या प्रथा म्हणजे आपला हक्क असल्याचे जावयांना वाटू लागले. त्यातून सासुरवाडीकडे अवास्तव मागण्या होऊ लागल्या. त्या पूर्ण केल्या नाही तर विवाहितेचा छळ होऊ लागला.

धोंड्याच्या महिन्यात जावयाची इच्छा पूर्ण न झाल्याने होणार्‍या छळाला कंटाळून एकाच महिन्यात ३  विवाहितांनी आपले जीवन संपविल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच धोंड्याचा हा महिना विवाहितांचा काळ बनला आहे. जावयाला एक तोळ्याची सोन्याची अंगठी न दिल्याने सासरी होत असलेला छळाला कंटाळून एका विवाहितेने चौथ्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारली. ती दुसर्‍या मजल्यावरील घराच्या गॅलरीत पडून तिचा मृत्यु झाला. वानवडी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

लक्ष्मी मारुती मिरेकर (वय ३३, रा. ग़्रॅण्ड स्क्रेअर सोसायटी, शंकर महाराज मठ, हडपसर) असे या विवाहितेचे नाव आहे. मारुती सावळा मिरेकर (वय ३६) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. सासु नागु सावळा मिरेकर (वय ६०) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना हडपसरमधील  ग्रॅण्ड स्क्वेअर सोसायटीमध्ये १० जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विठ्ठल अंबादास शिंदे (वय ३१, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण लक्ष्मी हिचा मारुती मिरेकर याच्याबरोबर विवाह झाला होता. माहेरहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिला सतत छळ करुन मारहाण केली जात होती. धोंड्याच्या महिन्यात एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणण्याकरीता तिला शारीरीक व मानसिक छळ केला गेला. या छळाला कंटाळून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवर गेली. तेथून तिने खाली उडी मारली. ती दुसर्‍या मजल्यावर असलेल्या गॅलरीत पडून तिचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करीत आहेत.

अधिक मासात जावयाला सोन्याची अंगठी न दिल्याने होणार्‍या छळामुळे तीन विवाहितांनी मृत्युला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

You may have missed