Pune Crime News | छळामुळे विवाहितेने पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आपले जीवन संपविले; भारती विद्यापीठ पोलिसांनी केला सासरा, दीरावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपविले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सासरा आणि दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
काजल सुखदेव काळे (वय २८, रा. बिबवेवाडी मार्केटयार्ड रोड, कुमार पार्क सोसायटीसमोर, बिबवेवाडी) असे या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत काजल हिच्या बहिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सासरे हनमंत काळे, दीर रतन हनमंत काळे Ratan Hanmant Kale (रा. वंटरसिटी सोसायटीजवळील झोपडपट्टी, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार ११ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंडर सिटी परिसरातील फुटपाथ लागत अनेक कुटुंबे तंबू टाकून राहतात. काजल काळे हिचे पती सुखदेव हे लिंबु मिरची विक्रीसाठी गेले होते. त्यावेळी लाकडे फोडण्यावरुन सासरे व तिचा दीर यांच्याशी तिचे भांडण झाले. तेव्हा दोघांनी तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. सातत्याने होणारी शिवीगाळ आणि मारहाण यामुळे त्रस्त झालेल्या काजल हिने तेथे ठेवलेल्या बाटलीतील पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले आणि काडीने पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. त्यानंतर तिच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.
