Pune Crime News | रिअल इस्टेट व्यवसाय वाढविण्यासाठी 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवून पितापुत्रांनी महिलेला घातला 40 लाखांना गंडा
पुणे : Pune Crime News | रिअल इस्टेट व्यवसास वाढविण्यासाठी ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी पितापुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रतनदेवी कांतीलाल ओसवाल (वय ५४, रा. जयभवानी सोसायटी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिल कटारिया (वय ६०), राहुल अनिल कटारिया Rahul Anil Kataria (वय ३५, रा. प्रेशियस जेम सोसायटी, कोरेगाव पार्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते १३ एप्रिल २०२६ पर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रतनदेवी ओसवाल यांची एल आय सी एंजट दीपक शहा यांच्या मध्यस्थीने ५ वर्षांपूर्वी अनिल सुगमन कटारिया व त्यांचा मुलगा राहुल कटारिया यांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळी ते कोरेगाव पार्क येथे रहात होते. ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत असल्याने त्यांची पैशांची उलाढाल मोठ्या प्रमाणात व चांगली होती. त्याला अधून मधून पैशाची गरज पडायची म्हणून ते ओसवाल यांच्याकडून कधी तरी पैसे मागायचा. घेतलेले पैसे परत करायचा म्हणून त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये कटारिया पितापुत्र त्यांच्या घरी आले. त्यांना कुठे तरी जमीन खरेदी करायची असून त्यासाठी त्यांना ४० लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना ही रक्कम उसनी नको असून ते फिर्यादी यांना म्हणाले की, तु ४० लाख रुपये मला दे, त्या बदल्यात मी दर महा १ लाख ६० हजार रुपये परत करेन, जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल, त्यावेळी मुळ रक्कम परत करेन. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली रक्कम काढून कटारिया यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ४० लाख रुपये दिले. त्यांनी करारनामा बनवुया असे म्हणाल्यावर त्याने माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला दर महिना १ लाख ६० हजार रुपये देतो, असे सांगितले.
त्याने ऑगस्ट २०२३ ते ऑक्टोंबर २०२३ असे सलग तीन महिने प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने पैसे देण्याची टाळाटाळ केली. त्या खुपच मागे लागल्यावर त्याने ओसवाल यांना ४० लाख रुपयांचे ३ धनादेश दिले. त्यांनी बँकेत टाकल्यावर त्यावरील सही जुळत नसल्याने ते परत आले. ही बाब त्यांनी कळविल्यावर त्याने असे होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर दुसरे चेक देतो, असे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. त्यांचा मोबाइल घेत नव्हते. त्यांनी कोरेगाव पार्क येथील घर सोडल्याचे त्यांना समजले. ते फक्त सिंग्नल अॅपच्या माध्यमातून संपर्क करत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याचे समजल्यावर त्याने सुरेश चौधरी याच्या मोबाईल वरुन संपर्क करुन एक महिन्यात पैसे देतो, असे सांगितले. प्रत्यक्षात पैसे न दिल्याने त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करीत आहेत.
