Pune Crime News | ‘एक फुल और दो माली’ ! पुण्यात लव्ह ट्रँगलचा थरार! प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराचा खून; पहिला प्रियकर अटकेत
पुणे : Pune Crime News | हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून झालेल्या वादात एका तरुणाचा कथित खून झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत अवघ्या काही वेळात आरोपीला पुणे–सोलापूर महामार्गावरून ताब्यात घेतले.
दिनेश महादेव झांबरे Dinesh Mahadev Jhambare (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील असून सध्या हिंजवडीतील मारोजी भूमकर चौक परिसरात राहत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे एका तरुणीसोबत शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही उच्च शिक्षणासाठी पुण्यात आले. दरम्यान, संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याने आरोपीच्या मनात राग निर्माण झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी आरोपी तरुणी आणि संबंधित तरुण राहत असलेल्या ठिकाणी गेला. तेथे त्याने कथितरीत्या लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी इर्टिगा कारमधून पुणे–सोलापूर मार्गे पंढरपूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हिंजवडी पोलिसांनी वाहनाची माहिती उरुळीकांचन पोलिसांना दिल्यानंतर महामार्गावर तातडीने नाकाबंदी करण्यात आली.
भरधाव वेगाने येणारी संशयित इर्टिगा कार अडवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान आरोपीने घटनेतील सहभाग कबूल केला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
