Pune Crime News | लोहमार्ग पोलीस निरीक्षकांनी 10 लाखांची खंडणी न दिल्याने बदनामी करणारी बातमी प्रसिद्ध करणार्या पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षकाला हॉटेलमध्ये बोलावून त्यांना तुमची बातमी प्रसिद्ध करुन कारवाई करुन नोकरी घालवतो, अशी धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी पत्रकाराने मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने व्हॉटसअॅपवर खोटी बातमी प्रसिद्ध करुन बदनामी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पत्रकारावर गुन्हा दाखल केला आहे.
मुज्जमिल शेख (Muzzamil Shaikh Reporter) असे या पत्रकाराचे नाव आहे. तो टाईम्स ऑफ महाराष्ट्र या डिजिटल न्यूज चॅनेलचा मुख्य संपादक व संचालक आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी लोहमार्ग येथील राखीव पोलीस निरीक्षक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस दलाचे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयावर नियमित ड्रिल सराव होत असतो. या ड्रिल सरावाची पोलीस मुख्यालयातील कर्मचारी यांच्याकडून मुज्जमील शेख याने माहिती घेतली. त्यानंतर फिर्यादी पोलीस निरीक्षक यांना धमकावुन शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड येथे ४ ऑगस्ट २०२६ रोजी बोलावले. त्यांना अर्धवट फोटो दाखवुन याची बातमी प्रसिद्ध करतो व तुमचेवर कारवाई करुन नोकरी घालवतो, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांना दबावात आणून १० लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी त्याच्या धमकीला भीक घातली नाही. तेव्हा त्याने त्याच्या व्हॉटसअॅपवर त्यांच्याविरुद्ध बातमी लावण्याची हेडलाईन पाठवुन पैसे देण्यासाठी फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीही फिर्यादी यांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी फिर्यादी विरुद्ध खोटी बातमी प्रसिद्ध करुन बदनामी केली. या बातमीच्या आधारावर फिर्यादी यांच्यावर कारवाई होण्याकरीता दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी कलम ३०८(२), २२४, ३५१ (२), ३५६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस एस जाधव तपास करीत आहेत.
