Pune PMC News | ओल्या कचर्‍यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसाठी प्रतिटन 2 हजार 90 रुपये ऐतिहासिक दर; विरोधकच काय सत्ताधार्‍यांकडून ‘नकारघंटा’ मिळण्याची शक्यता

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | ओल्या कचर्‍यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्यासाठी उभारण्यात येणार्‍या ३०० मेट्रीक टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी दोन निविदा पात्र ठरल्या आहेत. यामध्ये स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपनीचा २ हजार ९० रुपये प्रतिटन हा दर सर्वात कमी ठरला आहे. महापालिकेने नुकतेच ३०० टन ओला व २०० टन सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीची निविदा उघडली आहे. त्यामध्ये ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यासाठी प्रतिटन ७७२ रुपये खर्च येणार आहे. या दोन्ही निविदांचा आर्थिक आणि शाश्‍वत विचार करता कचर्‍यापासून बायोगॅस निर्मितीच्या प्रकल्पाला प्रशासनासोबतच लाकेप्रतिनिधींकडूनही ‘नकारघंटा’ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

महापालिकेने शहराच्या हद्दीबाहेर ७५ कि.मी.पर्यंत ओल्या कचर्‍यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीच्या ३०० टन क्षमतेच्या प्रकल्पाची निविदा काढली आहे. यासाठी प्रतिटन ६०० रुपये टिपिंग फी आणि ७ रुपये प्रतिटन वाहतूकीचा येण्याजाण्याचा खर्च देण्यात येणार आहे. प्रकल्पाची जागा ठेकेदाराची राहील मात्र प्रकल्प उभारणीसाठी केंद्र शासनाकडून मिळालेला ५० कोटी रुपयांचा निधी ठेकेदाराला देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट, साई पवनी कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि. आणि कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपन्यांच्या तीन निविदा आल्या होत्या. तांत्रिक छाननीमध्ये कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची निविदा अपात्र ठरल्यानंतर ब पाकीट उघडण्यात आले. त्यामध्ये स्वयंभू ट्रान्सपोर्ट ची निविदा कमी दराची असून त्यांनी एका टनासाठी २ हजार ९० रुपये खर्च नमूद केला आहे. तर साईपवनी कन्स्ट्रक्शन या कंपनीने २ हजार २७३ हा दर दिला आहे.

महापालिकेच्यावतीने आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी काढलेल्या निविदांमध्ये प्रतिटन २ हजार ९० दर हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे. नुकतेच देवाची उरूळी येथे ३०० टन ओल्या व २०० टन सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये भूमीग्रीन एन्व्हायरो या कंपनीची ९४३ दराची निविदा सर्वात कमी दराची ठरली. परंतू या दरांवर तसेच ओला व मिश्र कचर्‍यावर प्रक्रियेचा संयुक्त प्रकल्प करण्यावर विरोधकांनी रान उठविले. अखेर प्रशासनाने ठेकेदार कंपनीला दर कमी करण्यास सांगितले. या कंपनीने ९४३ रुपयांवरून ७७२ रुपयांपर्यंत दर कमी करण्याची तसेच दुसर्‍या वर्षापासून दरवर्षी ७ टक्के दरवाढ करण्याची तयारी दर्शविली. या प्रकल्पासाठी महापालिका जागा देणार असून प्रकल्प उभारणीचा खर्च ठेकेदार कंपनीला करायचा आहे. ५०० टन ओला आणि सुका कचर्‍यासाठी महापालिकेला २० वर्षांसाठी ५७७ कोटी रुपये खर्च येणार आहे. तर कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या प्रकल्पाला फक्त ३०० टन ओल्या कचर्‍यासाठी ५ टक्के दरवाढ गृहीत धरल्यास सुमारे ७५० कोटी रुपये खर्च येणार आहे.

या दरांची तुलना करता विरोधकांकडून बायोगॅस प्रकल्पाला जोरदार विरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निविदेच्या दरांबाबत घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला आहे. परंतू पुढील कार्यवाही वरिष्ठ अधिकारी पातळीवर होईल, असे सांगितले. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होउ शकला नाही.