Pune Crime News | कोंढव्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथे पूर्ववैमन्यासातून एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.
गोविंद विनायक हाके (वय २६, रा. कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नदीम खान (वय २६, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी तरुण हे एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. त्याच वैमनस्यातून हा हल्ला केल्याचा संशय आहे.
घटनेच्या वेळी गोविंद हाके हा आपल्या मित्रांसह शिवनेरीनगर येथील गल्ली क्रमांक ८ मध्ये उभा असताना आरोपीने अचानक तीक्ष्ण शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू आहे.
