Pune Crime News | 8 वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला असल्याने सिंहगडावर मुलीच्या वडिलांना तरुण-तरुणींनी केली मारहाण; अनेक तरुण तरुणींना मारहाण करणार्‍या 8 जणांवर गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सिंहगडावर फिरायला आलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला असल्याच्या कारणावरुन तिच्या वडिलांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगडावर फिरायला आलेल्या तरुण तरुणींना मारहाण करणार्‍या समस्त हिंदु बांधव आर्मीच्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DcIUzsppxvt

संकेत संजय पाटील (Sanket Sanjay Patil), आशिष दिलीप अपार (Ashish Dilip Apaar), रेवण नारायण कोकाटे (Revan Narayan Kokate), सायली सुजीत चव्हाण (Sayali Sujit Chavan), केतकी सुरज जाधव (Ketaki Suraj Jadhav), अमर रामचंद्र शिर्के (Amar Ramchandra Shirke), कुणाल किसन नलावडे (Kunal Kisan Nalavade), आर्या प्रविण कवडे (Arya Pravin Kavade) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अवधुत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. व्यंकटेश सेरेनिटी, धायरी) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड किल्यावर रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली पत्नी, मुलगा व पुतण्या अर्णव पाटील तसेच त्यांचे मित्र जोसेफ डिसोझा (रा. मांजरी) हे सिंहगडावर गेले होते. त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या ठिकाणी सर्वांनी भेट दिली. फोटो काढले. तेथून पुढे जात असताना तेथे समस्थ हिंदू बांधव आर्मी (एस एच बी आर्मी) चे ७ ते ८ जण तरुणतरुणी आले. आम्हाला बरमोडा घालून का आलात. येथे फोटो का काढता, खाली जा असे म्हणाले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना आम्ही जात आहोत, आता तुम्ही आम्हाला मारणार आहात का, असे म्हणाले. त्यावेळी त्यातील तिघे जण पुढे झाले. त्यांनी फिर्यादीच्या गालावर चापटीने मारहाण केली. एका तरुणीने त्यांच्या पत्नीचा हात पकडला. लोकांच्या गर्दीमध्ये ओढत नेले. त्यावेळी त्यांनी तुम्हाला हिंदु संस्कृती समजत का नाही, असे बोलून दमदाटी केली. त्यावेळी फिर्यादी हे खाली उतरत असताना पोलिसांची गाडी आली. त्यांनी हात दाखवुन गाडी थांबविली. सहायक पोलीस निरीक्षक चवरे व इतरांना त्यांनी आमच्या सोबत एस एच बी आर्मीच्या मुलांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनी तुम्ही पोलीस ठाण्यात जा, आम्ही सर्वांना घेऊन खाली येतो, असे सांगितले.

ते सर्व पोलीस ठाण्यात आले. तेथे खुशबू मिनानाथ बदावणे, करीश्मा मिनानाथ बदावणे, विशाल मनोहर खंडागळे, आदर्श दशरथराव ढेकाळे (रा. अमरवती) यांनाही या आर्मीच्या तरुण तरुणींने मारहाण केल्याचे सांगितले.

हवेली पोलिसांनी या तरुण तरुणींना पकडून आणले़ फिर्यादी व विशाल खंडागळे यांना संकेत पाटील, अमर शिर्के, कुणाल नलावडे यांनी मारहाण केली होती. त्यांच्या पत्नीस हाताने आर्या कवडे हिने ओढले होते. खुशबु बदावणे हिला सायली चव्हाण, केतकी जाधव यांनी मारहाण केली होती. त्या सर्वांनी मारहाण करणार्‍यांना ओळखले. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सांगितले की, सिंहगडावर फिरायला आलेल्या कुटुंबातील ८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला  होती. त्यावरुन तिच्या वडिलांना मारहाण केली. तसेच इतर तरुणतरुणींना मारहाण केली गेली. असे प्रकार खपवुन घेणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत अवधुत साळुंखे यांनी सोशल मीडियावर सांगितले की, आमच्याबरोबर असलेल्या कुटुंबातील एका ८ वर्षाच्या मुलीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील अजय देवगण याचा तानाजी चित्रपट पाहिला होता. तिला सिंहगड किल्ला व तानाजी मालुसरे यांचा पुतळा पहायचा हट्ट केला होता. तेव्हा त्यांनी सिंहगडावर अचानक जाण्याचे ठरवले. या ८ वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला होता. त्यावर या संस्कृती रक्षणाचा दावा करणार्‍या तरुणतरुणीनी आक्षेप घेतला. असा आक्षेप घेणार्‍या या तरुणांबरोबर असलेल्या तरुणींनी स्वत: मात्र ट्रॅक पँट व टी शर्ट घातला होता.