Pune Crime News | वडिलांनी दिलेले 20 लाख रुपये परत मागितल्याने पत्नीसह सासर्‍यांनी जावयाला लाकडी स्टुलने केली मारहाण; स्टुल तुटल्यावर त्याच्या पायाने मारहाण केल्याने बरगडी फ्रॅक्चर

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | वडिलांनी सासर्‍यांना दिलेले २० लाख रुपये घरातील फर्निचरच्या कामासाठी पत्नीकडे परत मागितल्याने सासरे, चुलत सासरे, पत्नी यांनी मिळून जावयाला धमकावुन हाताने, लाकडी स्टुलने बेदम मारहाण केली. मारहाणीत स्टुल तुटल्यावर त्याच्या लाकडी पायाने मारहाण करुन जखमी केले. त्यात जावयाची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे.

याबाबत कुमार गौरव विजयकुमार चौधरी (वय ३४, रा. एलहोम्स सोसायटी, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पुजा कुमारगौरव चौधरी Puja Kumar and Gaurav Chaudhary (रा. एलहोम्स सोसायटी, बाणेर), सासरे रमेश कुमार नेनाराम चौधरी (Ramesh Kumar Nenaram Chaudhary) आणि राजेश नेनाराम चौधरी Rajesh Nenaram Chaudhary (दोघे रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कुमारगौरव चौधरी यांच्यावर बाणेर मधील इलाईट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार गौरव चौधरी यांचा ६ जुलै २०१८ मध्ये पुजा चौधरी हिच्याशी विवाह झाला. २०१८ मध्ये फिर्यादीचे वडिल विजयकुमार चौधरी यांच्याकडून त्यांचे सासरे रमेश चौधरी यांनी २० लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते. त्याबाबत त्यांनी कुमार यांना काही माहिती दिली नव्हती. २०२३ मध्ये सासरे पैसे परत देत नसल्याने वडिलांनी कुमार यांना या पैशांचे सांगितले. त्यावेळी कुमार यांनी पुजा हिला या पैशांबाबत सांगितले. त्यावेळेपासून पुजा हिने छोट्या छोटया घरगुती कारणावरुन त्यांच्याशी भांडण्यास सुरुवात केली. मुली लहान असल्याने त्यांचा विचार करुन कुमार हे शांत बसले. त्यांच्या बालेवाडी येथील घरामध्ये फर्निचरचे कामासाठी पैशांची कमतरता असल्याने त्यांनी पुजाला सांगून वडिलांकडून पैसे घेण्यास सांगितले होते. तेव्हा पासून ती रागात होती.

१३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पुजा हिला फर्निचरचे साहित्य निवडीसाठी टिंबर मार्केट येथे गेली होती. जातेवेळी कुमार यांनी तिला समजावुन सांगितेल्या दुकानामध्ये जा, असे सांगितले. त्या दुकानाबरोबरच ती दुसर्‍या दुकानातही चौकशीसाठी गेली होती. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा कुमार हे घरातून निघून आतेभावाकडे गेले. १४ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारा वाजता घरी आले. पत्नी व दोन्ही मुली झोपल्या असल्याने कुमार बेडरुममध्ये जाऊन झोपले. थोड्या वेळाने पत्नी बेडरुममध्ये आली व त्यांच्याशी भांडणे करु लागली. त्याने आता झोप, उद्या सकाळी बघु असे सांगितले. तेव्हा तिने तुला चाकुने मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चुलत सासरे राजेश चौधरी हे बेडरुममध्ये आले. त्यांनी कुमार यांना उठवुन हॉलमध्ये बोलावले. त्यांचा आतेभाऊ अशोककुमार चौधरी याला मेसेज करुन बोलावुन घेतले.

त्यावेळी सासरे रमेशकुमार आणि राजेश चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गचंडी पकडून त्यांच्या पतीपत्नीमध्ये झालेल्या भांडणाबाबत माफी मागण्यास सांगितले. त्यावेळी कुमार यांनी माफी मागितली. परंतु सासर्‍यांचे समाधान झाले नाही. त्यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. राजेश चौधरी हे मारत असताना तुला व तुझ्या कुटुंबियांना खोट्या केसमध्ये अडवुन टाकतो, अशी धमकी देत होते. राजेश चौधरी यांनी लाकडी स्टुलने त्यांना मारहाण केली. मारहाण करताना स्टुल मोडला. तेव्हा त्याचा पाय उचलून मारहाण केली. त्यावेळी त्यांचा आतेभाऊ अशोकुमार चौधरी आले. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर, कोपर्‍याजवळ, डाव्या बाजुच्या बरगड्यावर, डाव्या पायाच्या पिंडरीवर जखमा झाल्या. बाणेरमधील इलाईट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  सी टी स्कॅन काढल्यावर त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करीत आहेत.

You may have missed