Pune Crime News | विषारी हातभट्टी दारू प्रकरणात आणखी २० संशयितांच्या शोधात सीआयडीची पाच विशेष पथके
पुणे : Pune Crime News | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पाच विशेष पथकांनी मोहीम हाती घेतली आहे.
२६ ते २८ मे दरम्यान विषारी हातभट्टीची दारू पिल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर दापोडी आणि हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांच्या क्लोन कॉपी प्राप्त करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. तसेच सर्व आरोपींच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड (आयपीडीआर) यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.
दरम्यान, साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या प्रकरणाबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास ती पुढे येऊन देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे. यासाठी दापोडी आणि हडपसर येथे दोन मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
