Pune Crime News | फिरायला जाण्यास नकार दिल्याने पत्नीच्या छातीत पायाने मारहाण करणार्या पतीला खडक पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक भांडणातून माहेरी येऊन राहणार्या पत्नीला त्याने फिरायला जाऊ, असे सांगितले़ त्याला नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत पायाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. खडक पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सुहास प्रल्हाद पाटणे Suhas Prahlad Patne (वय ३३, रा. राठी वाडा, गुरुवार पेठ) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडे पेठेत १६ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती सुहास पाटणे हा त्यांच्याबरोबर सतत भांडणे करुन मारहाण करतो. या कारणावरुन फिर्यादी या मागील दीड महिन्यांपासून घोरपडे पेठ येथे आईकडे राहत आहे. १६ जून रोजी दुपारी सुहास पाटणे हा त्यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांना माझ्याबरोबर फिरायला बाहेर चल, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्यातून सुहास पाटणे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या छातीवर पायाने मारहाण केली. तसेच उलट्या कोयत्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपर्याला मारून दुखापत केली. सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत तुळसुळकर तपास करीत आहेत.
