Rohit Pawar On VSR | अजित पवार अपघात प्रकरणात नवे आरोप; विमान कंपनीला कोट्यवधींचे देयक, रोहित पवारांची CID चौकशीची मागणी

Rohit Pawar On VSR | New allegations in Ajit Pawar accident case; Payment of crores to airline, Rohit Pawar demands CID inquiry

पुणे : Rohit Pawar On VSR | दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संबंधित विमान कंपनी आणि तिच्या मालकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवार यांनी दावा केला की, अपघातग्रस्त विमानाशी संबंधित व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. त्यांनी मोठ्या आर्थिक व्यवहारांकडे लक्ष वेधत सांगितले की, जानेवारी महिन्यापासून या कंपनीच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

त्यांच्या मते, २७ जानेवारी रोजी मोठी रक्कम देण्यात आली, तर अपघात झालेल्या दिवशीही कंपनीला कोट्यवधींचे देयक मिळाले. त्यानंतरच्या दिवशी, अंत्यविधीच्या दिवशीही मोठी रक्कम वर्ग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या व्यवहारांमुळे अनेक शंका निर्माण होत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात संबंधित कंपनीच्या मालकाचा काही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आमच्या नेत्याला न्याय मिळावा, हीच आमची भूमिका असून यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे, यासाठी सीआयडीने सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

You may have missed