Pune Crime News | दुबईतील कंपनीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांनी टाकला छापा; दोघा संचालकांना अटक, कंपनी सोडलेल्या तरुणीने फोडले बिंग
पुणे : Pune Crime News | दुबई येथील कंपनी असल्याचे सांगून बनावट कंपनीचे नाव धारण करुन कॉल सेंटर करीता आवश्यक असणारे प्रोजेक्ट व तसा सेटअप उभारण्यासाठी ७० लाख ८५ हजार रुपयांचा खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक करणार्या अहमदाबाद येथील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांनी छापा घातला. ही बनावट कंपनी चालविणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कंपनी सोडलेल्या तरुणीने फसवणुक केली जात असल्याचे सांगितल्याने कंपनीचे बिंग फुटले.
खुशी कौशल परमार ऊर्फ सान्वी शहा Khushi Kaushal Parmar alias Saanvi Shah (रा. सरदार चौक, जोधपूर, राजकोट, गुजरात), तुषार महेशकुमार तलपाडा Tushar Mahesh Kumar Talpada (रा. विशाल रेसिडेंन्सी अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत खराडी येथील तिरोहा स्ट्रॅटेजी प्रा. लि. या कंपनीच्या संचालकाने खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीचा व्यवसाय हा ऑनलाईन फुड डिलेव्हिरी प्लॅटफॉर्मला ग्राहक सेवा देण्याचे काम करते. जानेवारी २०२६ मध्ये त्यांना इन्स्ट्राग्रामवर सीट्रेक्स प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कन्सलटंट एलएलसी, दुबई या कंपनीची जाहिरात दिसली त्यांचे कंपनीतील लोकांचे फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म, कार रेंटल आणि ई कॉमर्स या ३ प्रोजेक्टवर काम करण्याची तयारी फिर्यादी यांनी दाखविली. त्यानुसार त्यांनी या तीन प्रोजेक्टसाठी ७ लाख ५३ हजार, १८ लाख ५४ हजार आणि ई कॉमर्स साठी १२ लाख ५३ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ऑनलाईन पैसे पाठविले. दुबईतील ऑक्सफर्ड टॉवर बिझनेस बे येथील कार्यालयात २७ मार्च २०२६ रोजी त्यांची दुबईत एरिका स्मीथ व जस्प्रीज कौर यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांना कार्यालय सेटअप तयार करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी सध्या असलेल्या त्यांच्या कार्यालयाच्या वरील मजल्यावर भाड्याने जागा घेतली. त्यावर ४१ लाख ४० हजार रुपये खर्च केला.
सीट्रेक्स कंपनीत काम करणार्या दिया भट या महिलेने कंपनी सोडली. ३१ मार्च २०२६ रोजी फिर्यादी यांना फोन करुन कळविले की, सीट्रेक्स कंपनीकडे कसल्याही प्रकारचे प्रोजेक्ट नसून कंपनीने तुमची फसवणूक केली आहे. सीट्रेक्स कंपनी ही दुबईची नसून अहमदाबाद स्थित प्रमोटप एचआर सोल्युशन्स अहमदाबाद नावाची कंपनी आहे. आम्ही अहमदाबाद या ठिकाणाहून दुबईचे कॉल सेंटरवरुन तुम्हाला कॉल करीत होतो, असे सांगितले. तुमच्या प्रमाणे त्यांनी इतरांना फसविले आहे. खुशी परमार, पार्शिव सिंग ऊर्फ सिद्धार्थ, कशिश शर्मा, श्रृती ऊर्फ रचना उमेश खुराणा, एरिका स्मीथ ऊर्फ रिचा, जस्प्रीत कौर ऊर्फ वर्षा, तुषार पटेल हे कंपनीमध्ये काम करीत असल्याचे तिने सांगितले. तिच्या सांगण्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी खराडी पोलिसांकडे फिर्याद दिली.
या फिर्यादीनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व फिर्यादीकडे केलेल्या चौकशीच्या आधारे संशयित आरोपी प्रमोटप एच आर सोल्युशन या नावाने अनधिकृत कंपनी स्थापन करुन अहमदाबाद येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथून १ लाख ९८ हजार रुपयांचे कॉम्प्युटर सी पी यु, लॅपटॉप, मोबाईल फोन, सीसीटीव्ही डिव्हिआर मशीन्स, बनावट दुबई स्थित बनावट सिट्रीक्स कंपनीचे नावाने असलेल्या संभाषणाचे स्क्रिप्टसची कागदपत्रे जप्त केली. तेथील दोघांना अटक केली. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, मनोज खरपुडे, साहेबराव गुंडाळे, सुरज जाधव, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, विलास केदारी, महेश बोराडे, प्रतिभा पवार, मनीषा ताठे यांनी केले आहे.
