Pune Crime News | तरुणाच्या डोळयावर, चेहर्‍यावर स्प्रे मारुन 25 लाख 90 हजारांची रोकड  भरदिवसा चोरट्यांनी लांबविली; धनकवडीतील टपाल कार्यालयाजवळील घटना

Crime

पुणे : Pune Crime News |  व्यवसायातील पैसे जमा करण्यासाठी बँकेत जात असलेल्या तरुणाच्या डोळ्यावर व चेहर्‍यावर स्प्रे मारुन दोघा चोरट्यांनी २५ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग हिसकावुन चोरुन नेली. ही घटना संभाजीनगर येथील धनकवडी टपाल  कार्यालयाजवळ सोमवारी २५ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.

याबाबत अनिकेत मानुक कदम (वय ४७, रा. विद्याधन सोसायटी, चव्हाण कॉम्प्लेक्स, राजे चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सहकारनगर पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत कदम याचा परकीय चलन विनिमय याचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन शाखा आहेत. शुक्रवार, शनिवार या दिवशी जमा झालेली रक्कम ते सोमवारी बँकेत भरत असतात. १० लाख रुपये शिल्लक ठेवून २५ लाख ४० हजार रुपये एका  बॅगेमध्ये भरुन ते पीडीसीसी बँकेत जात होते. दुचाकीवरुन ते एकटेच जात असताना धनकवडी टपाल कार्यालयाजवळील गल्लीत दोन चोरटे दुचाकीवरुन आले. त्यांनी कदम यांच्या डोळ्यावर व चेहर्‍यावर स्प्रे मारला़ डोळे चुरुचुरु लागल्याने त्यांनी गाडी थांबविली. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. या घटनेमुळे घाबरलेल्या अनिकेत कदम यांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

You may have missed