Pune Crime News | शासनाच्या विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवुन 117 तरुणांना बनावट जॉईनिंग लेटर देऊन तब्बल 3 कोटी 73 लाखांची फसवणूक; बारामतीत गुन्हा दाखल, मित्रानेच केली फसवणूक, एकच खळबळ
पुणे : Pune Crime News | महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात नोकरीच्या आमिषाने प्रत्येकी ३ लाख व रेल्वेत नोकरीसाठी ४ लाख रुपये घेऊन शासकीय विभागाची खोटी निवड सुची व संबंधित शासकीय विभागाचे बनावट शिक्के वापरुन खोटे जॉईनिंग लेटर दिले. विभागातील नेमणुक असलेल्या कार्यालयामध्ये मॅनेज करुन ट्रेनिंगला पाठवुन त्यांना शासकीय विभागात नोकरीला लावल्याचे दाखवून दोघांनी तब्बल ११७ तरुणांना ३ कोटी ७३ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मित्रावर विश्वास ठेवल्याने लेबर कॉन्ट्रॅक्टर हे अडचणीत आले आहेत.
सुबायू सरकार उर्फ राणा (रा. वर्धमान कलकत्ता, पश्चिम बंगाल, सध्या रा. दिल्ली) आणि प्रमोद भगवान गुरव Pramod Bhagwan Gurav (रा. ज्योर्तिलिंग हाऊसिंग सोसायटी, घणसोली नवी मुंबई, मुळ रा. उंद, कराड जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रणजित हरिभाऊ मोढे (वय ३६, रा. कनक रेसिडेन्सी, सूर्यनगरी, बारामती) यांनी बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी २०२२ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजित मोढे हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कुशल, अकुशल कामगार पुरविण्याचे काम करतात. त्यांचे मित्र प्रमोद गुरव हे त्यांचा मित्र सुबायू समीर सरकार यांना घेऊन जानेवारी २०२२ मध्ये त्यांच्याकडे आले. सरकार यांची ओळख करुन देऊन ते महाराष्ट्रातील आरोय विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, समाज कल्याण विभाग, रेल्वे, ओएनजीसी मुंबई या ठिकाणी शासकीय विभागात मुलांना नोकरीस लावत असतात. तुमच्याकडे कोणी मुले असतील तर सांगा, त्यांना नोकरी लावून देतील, असे सांगितले. त्यांच्याकडे मुले नसल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर काही दिवसांनी प्रमोद गुरव हा खराडी येथे त्यांना भेटला. सरकार याने आता निघालेल्या शासनाचे आरोग्य विभाग व वनरक्षक भरतीमध्ये १३० मुलांना नोकरीला लावले असून त्या मुलांची यादी दाखविली. त्यांना दाखविलेल्या यादीतील मुलांची नावे निवड यादीमध्ये दिसली. त्यामुळे सुभायू सरकार हे खरोखरच मुलांना शासकीय खात्यात नोकरीला लावतात, यावर त्यांचा विश्वास बसला.
प्रमोद गुरव याने सांगितले की, आतापर्यंत त्यांनी ४०० मुलांना वेगवेगळ्या खात्यामध्ये कामाला लावले आहे. एकदा पण फसवणुक झालेली नाही. मित्राच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सुभायू सरकार याला भेटून माहिती घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांची बारामतीतील सिटीइन हॉटेलमध्ये भेट झाली. प्रत्येकी सरासरी ५ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानंतरच्या भेटीत त्याने नोकर भरती निघाल्यानंतर मुलांना फॉर्म भरायला सांगा. त्याची एक कॉपी व ३ लाख रुपये, रेल्वे नोकरी पाहिजे असेल तर ४ लाख रुपये अॅडव्हान्स द्यावे लागतील, असे सांगितले. प्रमोद गुरव याने मी त्याचे सोबत ८ वर्षापासून काम करत असल्याचे सांगून विश्वास दिला. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी मुलांना माहिती दिली. २०२३ मध्ये शासकीय विभागात नोकर भरती निघाल्यानंतर त्यांनी मुलांना फॉर्म भरायला लावला. २०२३ -२४ च्या भरतीसाठी सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुलांना माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात ९५ मुले आणि रेल्वेसाठी २२ मुले अशा एकूण ११७ जणांचे एकूण ३ कोटी ७३ लाख रुपये जमा करुन त्यांनी सुभायू सरकार व प्रमोद गुरव यांच्याकडे दिले.
त्यानंतर त्याने शासकीय विभागाची खोटी निवड सुची व संबंधित शासकीय विभागाचे बनावट शिक्के वापरुन खोटे जॉईनिंग लेटर तयार केले. ते लेटर मुलांना देऊन त्या त्या विभागातील नेमणूक असलेल्या कार्यालयामध्ये मॅनेज करुन मुलांना ट्रेनिंगला पाठवून त्यांना शासकीय विभागात नोकरीला लावल्याचे दाखवले. प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी न लावता फसवणूक केली. हे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्याची वारंवार मागणी केली. दरवेळी ते काहीतरी कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करु लागले. त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यास टाळू लागले़ शेवटी त्यांनी बारामती पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले की, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पथके दोघांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.
फिर्यादी रणजित मोढे यांनी सांगितले की, मित्रावर विश्वास ठेवल्याने मी अडचणीत आलो आहे. माझ्यामार्फत हा सर्व व्यवहार झाल्याने मुलांकडून घेतलेल्या पैशांपैकी बरेच पैसे मी परत केले आहेत. नातेवाईकांचे पैसे देणे बाकी आहेत.
ते दोघे मुलांना जेथील नोकरीचे लेटर दिले. त्या पुणे, संभाजीनगर, नाशिक येथील कार्यालयात घेऊन जात. मुलांना बाहेर गेटवर थांबवुन ठेवत. स्वत: आत जाऊन येत असत. काही वेळेला त्याची काही माणसे बरोबर असत. अशा प्रकारे त्यांनी काही दिवस मुलांना झुलवत ठेवले होते.
