Pune Crime News | पुणे : मध्यरात्रीनंतर रिक्षामध्ये डीजे लावून दारु पिऊन गोंधळ घालणार्‍यांना जाब विचारल्याने टोळक्याची तरुणाला बेदम मारहाण

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  दारु पिऊन मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षामध्ये डि जे लावून गोंधळ घालणार्‍यांना हटकल्याने टोळक्याने तरुणाला दगडाने, लाकडाने मारहाण करुन जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मोहन विजय पंचगाम (वय ४१, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिपेश साने, गणेश नाईक (रा. सोमवार पेठ) व त्यांच्या २ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर १ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपेश साने, गणेश नाईक व त्यांचे दोन साथीदार हे मध्यरात्रीपासून रिक्षामध्ये डिजे लावून दारु पिऊन नाचत होते. पहाटे २ वाजेपर्यंत त्यांचा हा तमाशा सुरु होता. त्यामुळे मोहन पंचगाम यांनी त्यांना इथे गोंधळ का घालत आहात, आपापल्या घरी जावा, इथे लोकांच्या झोपा का खराब करीत आहात, असे बोलले. त्याचा राग आल्याने त्यांनी मोहन पंचगाम यांना शिवीगाळ करुन दगडाने, लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलीस हवालदार खैरे तपास करीत आहेत.

You may have missed