Pune Crime News | अनैतिक संबंधाबाबत जाब विचारल्याने होणार्या मारहाणीला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन, पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पतीचे अनैतिक संबंध असल्याबाबत जाब विचारल्याने त्याने वेळोवेळी केलेली मारहाण, शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
मोनिका सुनिल कांबळे (वय २९, रा. लक्ष्मी गंगा हाईटस, सनसिटी, आनंदनगर) असे मृत्यु पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मोनिका यांच्या भावाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुनिल ज्ञानोबा कांबळे Sunil Dnyanoba Kamble (रा. संविधान कॉम्प्लेक्स, डोणजे ता. हवेली, मुळ रा. लक्ष्मी गंगा हाईटस, सनसिटी, आनंदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सनसिटीमधील लक्ष्मी गंगा हाईटस येथे ११ जून रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका या मुळच्या बीडच्या राहणार्या होत्या. त्यांचा विवाह २०१३ मध्ये सुनिल कांबळे याच्याबरोबर झाला. त्यांना एक मुलगी आहे. सुनिल कांबळे याचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. तो अनेकदा रात्री घरी येत नसे. त्यावरुन मोनिका हिला त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन तिने सुनिल कांबळे याला जाब विचारला. या कारणावरुन त्याने मोनिका हिला वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण केली. शारीरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून मोनिका हिने ११ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करीत आहेत.
