Pune FDA News | पुणे : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोरेगाव पार्कमधील सैराट बिर्याणी, मलकापूर (सातारा) येथील हॉटेल शाही आणि लोणावळ्यातील साबेर रेस्टॉरंटचा परवाना निलंबित
पुणे : Pune FDA News | अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील निर्धारित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील तीन हॉटेलचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सैराट बिर्याणी, सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील हॉटेल शाही आणि लोणावळ्यातील साबेर रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाने १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, संबंधित आस्थापनांची तपासणी केली असता अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांनी आस्थापनांमध्ये स्वच्छता राखणे, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी करणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीदरम्यान या नियमांचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचे आढळल्याने तीनही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
