Pune Crime News | ‘ऑपरेशन ग्लोबल हंट’! पुण्यातील 3,600 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी विरेंदर सिंह बसोया NCB च्या कोठडीत

Pune Crime News | 'Operation Global Hunt'! Virender Singh Basoya, the main accused in Pune's ₹3,600 crore drug case, in NCB custody

पुणे : Pune Crime News |  पुण्यातील सुमारे 3 हजार 600 कोटी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तपास यंत्रणांकडून उल्लेख करण्यात आलेला विरेंदर सिंह बसोया ऊर्फ वीरू (Virender Singh Basoya alias Veeru)  याला अखेर संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी प्रकरणाशीही त्याचे संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

‘ऑपरेशन ग्लोबल हंट’अंतर्गत बसोयाला 14 ऑगस्ट रोजी भारतात आणण्यात आले. त्यानंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 ऑगस्टपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) कोठडीत पाठवले.

फेब्रुवारी 2024 मध्ये पुणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या मोठ्या मेफेड्रोन तस्करी रॅकेटमध्ये बसोया हा प्रमुख आरोपी आहे. तपासादरम्यान पुणे आणि दिल्ली येथून एकूण सुमारे 1 हजार 837 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. यामध्ये पुण्यातून सुमारे 867 किलो, तर दिल्लीतून 970 किलो मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास पुढे NCB च्या मुंबई विभागाकडे सोपवण्यात आला. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, बसोया हा लंडनमधून मेफेड्रोन तस्करीचे जाळे चालवण्याचा आरोप असलेल्या संदीप धुनियाच्या संपर्कात होता. दिल्लीतून 970 किलो मेफेड्रोन पाठवण्याच्या कथित कटातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यातील प्रकरणात नाव समोर आल्यानंतर बसोया भारतातून पसार होऊन दुबईला गेल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यानंतर NCBच्या विनंतीवरून इंटरपोलमार्फत त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. जून 2026 मध्ये त्याला UAEमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.

आता आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क, परदेशातील आर्थिक व्यवहार, तस्करीचे मार्ग आणि या रॅकेटमधील अन्य आरोपींची भूमिका याबाबत त्याची चौकशी केली जात आहे. पुणे प्रकरणात आतापर्यंत 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या कोकेन आणि अन्य अमली पदार्थ तस्करी प्रकरणाशीही बसोयाचे संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.