Pune Crime News | पुण्यात संतापजनक प्रकार! मस्ती केल्याने 3 वर्षांच्या चिमुकल्याला स्वच्छतागृहात डांबल्याचा आरोप; युरो किड्सच्या शिक्षिकेसह व्यवस्थापिकेवर गुन्हा
पुणे : Pune Crime News | शाळेत मस्ती केल्याच्या कारणावरून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षिकेने स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यातील घोरपडी परिसरातील युरो किड्स शाळेत घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिका आणि शाळेच्या व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांपासून दुपारी २ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावरील युरो किड्स शाळेत घडली.
तक्रारदार महिलेचा तीन वर्षांचा मुलगा या शाळेत नर्सरीमध्ये शिक्षण घेत आहे. मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी त्या शाळेत गेल्या असता, मस्ती केल्यामुळे त्याला एका खोलीत बंद केल्याचे संबंधित शिक्षिकेने सांगितले.
मात्र, आईने मुलाकडे याबाबत विचारणा केली असता, आपल्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आईने शाळेच्या व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्याची मागणी केली.
आरोपानुसार, शाळेच्या व्यवस्थापिकेने सुरुवातीला सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्यास टाळाटाळ केली. पालकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर २१ सप्टेंबर रोजी त्यांना सीसीटीव्ही चित्रीकरण दाखविण्यात आले.
या चित्रीकरणात संबंधित शिक्षिका चिमुकल्याला काही वेळासाठी स्वच्छतागृहात बंद करताना दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही चित्रीकरण ‘ओव्हरराइट’ झाल्याचा दावा; पालकांचा गंभीर आरोप
विशेष म्हणजे, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला असतानाही दुसऱ्या दिवशी संबंधित चित्रीकरण ‘ओव्हरराइट’ झाल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
याप्रकरणी मुलाच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शिक्षिका आणि शाळेच्या व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
