Pune Crime News | पुणे: 27 वर्षीय तरुणीने तरुणाशी बळजबरीने लग्न करण्यासाठी तरुणाचे केले अपहरण; पोलिसांनी बीडमधून तरुणीसह सात जणांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लग्नास नकार देणाऱ्या तरुणाचे भररस्त्यातून अपहरण करून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून एका २७ वर्षीय तरुणीसह सात जणांना अटक करत अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली.

सुदाम माणिक ताठे Sudam Manik Tathe (वय २३), शेख सोहेल शेख अफसर Shaikh Sohail Shaikh Afsar (वय २१), देविदास भगवान पांजगे Devidas Bhagwan Panjage (वय २१), वैभव मिलिंद शेळके Vaibhav Milind Shelke (वय २२), प्रसाद बंडू गवळी Prasad Bandu Gavli (वय २७, सर्व रा. परभणी), मोटार चालक सारंग भगवानराव काकडे Sarang Bhagwanrao Kakade (वय ३३, रा. नांदेड) आणि एक तरुणी (वय २७, रा. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणीकंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास २९ वर्षीय तरुणाला काही आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने मोटारीत बसवून पळवून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या टुरिस्ट वाहनाचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत अखेर माजलगाव येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत अपहृत नीलेश बोद्रे यांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणीची नीलेश यांच्याशी मैत्री होती. तिला त्यांच्याशी विवाह करायचा होता. मात्र नीलेश लग्नास तयार नसल्याने तिने साथीदारांच्या मदतीने त्यांचे अपहरण करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात तरुणीसह सात आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

You may have missed