Pune Crime News | जनगणना कामास नकार; लोणी काळभोरमधील पाच शिक्षकांवर गुन्हा, तहसील प्रशासनाची कठोर कारवाई
पुणे : Pune Crime News | केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत सहकार्य करण्यास नकार दिल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील प्रशासनाच्या आदेशानंतरही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.
ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिल्पा राजाभाऊ येरमाळकर (Shilpa Rajabhau Yermalkar), सुनिल दिलीप शेळके (Sunil Dilip Shelke), शिवाजी संभाजी गायाकवाड (Shivaji Sambhaji Gayakwad), प्रदीप बबन पारधी (Pradeep Baban Pardhi) आणि शन्नो जॉक्सन गगादे (Shanno Joxon Gagade) या शिक्षकांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माहितीनुसार, जनगणना 2027 च्या तयारीअंतर्गत संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तहसीलदार तथा चार्ज ऑफिसर तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांमार्फत त्यांना आदेश कळविले होते.
मात्र, आदेश मिळूनही संबंधित शिक्षकांनी जनगणना कामासाठी हजर राहण्यास टाळाटाळ केल्याचे आणि काम करण्यास नकार दिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यामुळे जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
