Pune Crime News | पुणे : बुलढाणा अर्बन को. ऑप. क्रिडेट सोसा. मध्ये (मल्टीस्टेट) 34 कोटींचा ‘घोटाळा’ (आर्थिक नुकसान) करणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळे यांच्यावर गुन्हा दाखल  

Pune Crime News | Pune: A case has been registered against Chief Executive Officer Shirish Deshpande and Divisional Manager Yogini Pokale for a ₹34 crore 'scam' (financial loss) at the Buldana Urban Co-operative Credit Society (Multistate).

पुणे : Pune Crime News | बुलढाणा अर्बन को ऑप क्रिडेट सोसायटीच्या (Buldhana Urban Co-op Credit Society) संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करुन सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलढाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे Shirish Dinkar Deshpande (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे Yogini Yogesh Pokale (वय ४४) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. बुलढाणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलढाणा अर्बन क्रिडेट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका होत्या. त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आल्याने दोघांना सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर सोसायटीच्या खात्यांचा फॉरेसिक अ‍ॅडिट केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापाल मोहन दलाल यांनी फिर्याद दिली आहे.

शिरीष देशपांडे व योगिनी पोकळे यांनी संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांचे पदाचा गैरवापर करुन बुलढाणा को ऑप क्रेडिट सोसायटीच्या बुलढाणा बँकेचे नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, स्वत:च्या फायद्यासाठी ० टक्के दराने कर्ज घेतले. बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडीयरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन सदस्यत्व देणे, व नंतर रद्द करणे, खोटे बॅलन्सशिट आर ओ सीचे साईटवर अपलोड करणे असे अनेक गैरप्रकार केले. त्याचबरोबर सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय व्याजाची रक्कम माफ करणे, तारण मालमत्ता विक्री करुन या रक्कमा सोसायटीमध्ये न भरणे, परवानगीशिवाय मेटेनन्सचा खर्च करणे, कर्जदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम भरुन त्या इतर बँक खात्यात बेकायदेशीरपणे वळवणे, इतर खात्यांमध्ये अफरातफर करणे, अशा प्रकारे गैरव्यवहार करुन त्यांनी संस्थेची वैधानिक लेखा परिक्षक यांच्या अहवालाप्रमाणे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. सोसायटीच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.

You may have missed