Pune Crime News | पुणे : बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये विनापरवाना संगीत पार्टी ! मद्याचे वितरण करणार्या हॉटेलमालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल; 6 महिलांसह 30 जण होते पहाटेपर्यंत तर्रट होऊन नाचत
पुणे : Pune Crime News | हॉटेलला कोणताही परवाना नसताना तेथे संगीत पार्टी आयोजित करुन पहाटे साडेचार वाजेपर्यंत कर्णकर्कश आवाजात स्पीकर्स लावून मद्याचा विना परवाना पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी ६ तरुणींसह ३० तरुण दारुच्या नशेत तर्रट होऊन पहाटेपर्यंत नाचत होते. विमानतळ पोलिसांनी हॉटेल मालक व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.स्नुकर टेबलचा व्यवसाय करत असताना तेथे पार्टी आयोजित करुन मद्यपुरवठा केल्याचे दिसून आले.
हॉटेल मालक नितीन दिवाकर जाधव Nitin Divakar Jadhav (वय ४३, रा. मधुबन सोसायटी, विश्रांतवाडी), युवराज प्रमोद नायडु Yuvraj Pramod Naidu (वय ३४, रा. राजवर्धन हाईटस, टिंगरेनगर), हॉटेल मॅनेजर दीपक रामचंद्र कांबळे Deepak Ramchandra Kamble (वय ३५, रा. ताडीवाला रोड), कामगार दीपक रमेश काळेकर Deepak Ramesh Kalekar (वय २६, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), सागर उत्तम विश्वास Sagar Uttam Vishwas (वय २२, रा. विमाननगर), सुरबती सुपाल सरकार Surbati Supal Sarkar (वय २०, रा. विमाननगर), उत्तम किशनापदा मंडल (वय २९, रा. बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना विमाननगरमधील सोकोरेनगर येथील एअरपोर्ट रोडवरील बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये २४ ऑगस्टला पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
विमाननगर पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, बॅक बेंचर्स हॉटेल सुरु असून तेथे पहाटेपर्यंत मद्य विक्री चालू आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर यांनी रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक महेश बोलके यांना कळविले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांना कळवून जादा पोलीस बंदोबस्त मागविला. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस तेथे पोहचले तर, तेथे मोठ्या आवाजात स्पीकर लावून काही पुरुष व महिला नाच करत होते. तेथे बेकायदेशीरपणे मद्य विक्री सुरु होती. पोलिसांनी सर्वांना बाजूला थांबविले. हॉटेल मालक नितीन जाधव व युवराज नायडु यांनी हे भागीदारात हॉटेल सुरु केले आहेत. पोलिसांनी हॉटेलचा परवाना, दारुविक्री व दारुचे ग्राहकांना वितरण करण्याचा परवाना विचारल्यावर मालक नितीन जाधव याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या २४ पुरुषांना मेडिकलसाठी ससून रुग्णालयात पाठविले. त्यातील ६ तरुणींचे वाहतूक पोलिसांकडील ब्रेथ अॅनालायझरने तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. पोलिसांनी हॉटेल मधून ७ हजार ६९० रुपयांच्या दारुच्या बाटल्या, इतर साहित्य तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. हॉटेल मालकासह कामगारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड तपास करीत आहेत.
