Pune Crime News | प्लेसमेंट कंपनीच्या व्यवस्थापकाचे भरदिवसा केले अपहरण; वानवडी पोलिसांनी अवघ्या ३ तासात केली सुटका, एकाला केली अटक 

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्लेसमेंट देणार्‍या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारा तरुण कामावरुन घरी येत असताना पांढर्‍या रंगाच्या वॅगनरमधून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वानवडी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीतून अवघ्या ३ तासात अपहरण झालेल्याची सुटका केली. तसेच एकाला अटक केली आहे.

अभिलाष प्रताप शिंदे (वय ३३, रा. मिरचंदाणी बॅलेजिआ सोसायटी, उंड्री) असे अपहरण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी जागृती अभिलाष शिंदे (वय ३०) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदीप प्रदीप सावंत Sandeep Pradeep Sawant (वय ३३, रा. नेताजीनगर) याला अटक केली आहे. ही घटना वानवडी येथील केदारी पेट्रोलपंपाजवळील गंगा सॅटेलाईट सोसायटीसमोर शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाष शिंदे हे स्टारवन असोसिएट या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौक परिसरात नोकरी पुरविणार्‍या या कंपनीचे कार्यालय आहे. अभिलाष शिंदे हे शनिवारी दुपारी कंपनीतून दुचाकीवर घरी जात होते. केदारी पेट्रोल पंपाजवळ त्यांना कंपनीतील कामगाराचा फोन आल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याकडेला उभी करुन ते फोनवर बोलत होते. त्याचवेळी पांढर्‍या रंगाच्या वॅगनर मधून आलेल्यांनी त्यांचे अपहरण करुन त्यांना गाडीमध्ये टाकून कोठेतरी घेऊन गेले. अभिलाष शिंदे यांच्याशी फोनवर बोलणार्‍या कामगाराच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शिंदे यांची पत्नी जागृती शिंदे हिला फोन करुन हे सांगितले. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क करुन पतीचे अपहरण झाल्याचे सांगितले.

वानवडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावरुन शिंदे यांचे अपहरण झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात शिंदे यांना घोरपडी पेठेत नेले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घोरपडी पेठेत शोध घेऊन अभिलाष शिंदे यांची सुटका केली. तेथून कारचालक संदीप सावंत याला ताब्यात घेतले.

दोघेही अपहरणामागील नेमके कारण स्पष्ट करत नाहीत. अभिलाष शिंदे यांच्याकडे चौकशी केल्यावर ते तक्रार देण्यासही तयार नव्हते. त्यांच्या पत्नीच्या आग्रहावरुन फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अभिलाष शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की, आपल्याला वॅगनरमधून जबरदस्तीने घोरपडी पेठ येथे आणले. तेथे काही जण दारु पित बसले होते. त्यांनी दारु पिण्यास सांगितले म्हणून त्यांच्याबरोबर दारु पित बसलो होतो.

संदीप सावंत याने आपण फोनवर बोलत असताना तिघांनी आपली गाडी पळवुन नेली. तिचा शोध घेत येथे आलो. तेव्हा येथे सर्व जण दारु पित बसले होते. संदीप सावंत याच्या नोकरीशी संबंधित प्रकरण आहे का याचा पोलीस शोध घेत असून दोघेही नेमके काहीतरी लपवुन ठेवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करीत आहेत.

You may have missed