Pune Crime News | पुणे : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे उघडकीस, 2 महिलांसह तिघांना अटक
पुणे : Pune Crime News | शिवणे येथील एका फ्लॅटमध्ये अल्पवयीन मुलीला आणून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने २ महिला व एका दलालाला अटक केली आहे.
पिंटु ग्यानदेव चव्हाण Pintu Gyandev Chavan (वय ३८), इंदु संतोष निखरे (वय ५२, दोघे रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, उत्तमनगर, शिवणे रोड, शिवणे) आणि सुनंदा नंदु लोहकरे (वय ४०, रा. अभिनव कॉलेजजवळ, नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़
पिंटु चव्हाण आणि इंदु निखरे हे दोघे एकत्र राहतात. शिवणे येथील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये ते एका महिलेच्या मदतीने अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे व त्यांचे सहकारी हे १५ दिवस त्यांच्यावर पाळत ठेवून होते. खात्री पटल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक तयार केला. बनावट ग्राहकाने १० सप्टेंबर रोजी त्यांच्याशी संपर्क साधला. पिंटु चव्हाण याने त्याला साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये बोलवले. त्यानुसार हा बनावट ग्राहक तेथे गेला. अल्पवयीन मुलीला त्याच्यासमोर आणल्यानंतर त्याने पोलिसांना इशारा केला. बनावट ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी या फ्लॅटवर छापा मारुन तिघांना ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलीची सुटका केली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध नियम तसेच पोक्सो खाली गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रानखान नदाफ, अविनाश कोंडे, किरण बरडे, वैशाली इंगळे, रेश्मा कंक यांनी केली आहे.
