Pune Traffic Updates | पुणे : गणपती प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान विशेष व्यवस्था
पुणे : Pune Traffic Updates | गणेशोत्सव 2026 निमित्त गणेशमूर्ती खरेदी आणि श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी शहरातील विविध भागांत भाविक आणि गणेश मंडळांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व्यवस्था जाहीर केली आहे.
गणेशभक्त आणि मंडळांकडून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत गणेशमूर्तींची खरेदी केली जाते. डेंगळे पूल ते शिवाजी पूलदरम्यान श्रमिक भवन आणि अण्णाभाऊ साठे चौक परिसर, कसबा पेठ पोलीस चौकी–जिजामाता चौक–मंडई, सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर, सिंहगड रोड तसेच कुंभारवाडा आणि केशवनगर-मुंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल आहेत.
या भागांत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी 12, 13 आणि 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.
शिवाजी रोड वाहतुकीसाठी बंद
गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा शिवाजी रोडवरील टप्पा आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
गाडगीळ पुतळा चौकातून वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौकमार्गे पुढे जाता येईल. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक आणि टिळक चौकमार्गे पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
झाशी राणी चौक–खुडे चौक–डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही पुणे महापालिका, मंगला सिनेमा लेन, प्रीमियर गॅरेज चौक आणि शिवाजी पूलमार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
सिंहगड रोडवर नो-पार्किंग
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या सिंहगड रोडवरील टप्प्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या भागात कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई असेल.
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस आणि निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
केशवनगर-मुंढव्यात एकेरी वाहतूक
12 ते 14 सप्टेंबरदरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत केशवनगर आणि मुंढवा परिसरात आवश्यकतेनुसार तात्पुरते वाहतूक बदल लागू राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या वाहनांनी गायरान वस्ती रोड, रेणुका माता मंदिर आणि विहान सोसायटी रोडमार्गे मांजरी रोडकडे जावे. खराडी ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांना रेणुका माता मंदिरातून विहान सोसायटी रोडमार्गे शिवाजी महाराज चौकाकडे पाठवण्यात येईल.
मुंढवा चौक–शिवाजी चौक–कल्याणी बंगला रोड आणि शिवाजी चौक–झेड कॉर्नर, केशवनगर या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
फडके हौद चौक–जिजामाता चौक–फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक–बुधवार चौक–मोती चौक आणि मंगला टॉकीजसमोरील प्रीमियर गॅरेज लेनमधून कुंभारवेसकडे सर्वसाधारण वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहील.
गणेशमूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या भाविक आणि मंडळांसाठी न्या. रानडे पथ, वीर संताजी घोरपडे पथ, टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्ता, मंडईतील मिनर्व्हा व आर्यन वाहनतळ तसेच शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पीएमपीएमएल बस मार्गातही बदल
शिवाजीनगरहून शिवाजी रोडमार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, टिळक चौक आणि टिळक रोडमार्गे स्वारगेटकडे जातील.
मनपा बसथांब्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस झाशी राणी चौक, जंगली महाराज रोड, अलका टॉकीज चौक आणि टिळक रोड किंवा शास्त्री रोडमार्गे पुढे जातील.
वाहनचालकांनी या तात्पुरत्या वाहतूक बदलांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
