Pune Crime News | पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | वाघोली परिसरात भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. नवनाथ विष्णू मंजुळकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी पुणे-अहिल्यानगर मार्गावरील कटकेवाडी येथील शंभूराज हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत किशोर पंडित पवार (वय ३४, रा. वाघोली) यांनी तक्रार दिली आहे. गोविंदसिंह अशोककुमार घोष (वय ३८, मूळ रा. झाशी, उत्तर प्रदेश) असे आरोपी चालकाचे नाव आहे. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पुणे-अहिल्यानगर मार्गावर वाढता वेग आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
